राजकीय वातावरण तापले, अरविंद केजरीवाल, काँग्रेसच्या अलका लांबांचे यांचा गोवा दौरा
प्रतिनिधी /वास्को
दिल्लीचे मुख्यमंत्री तसेच आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या अलका लांबा एकाच विमानातून एकाच वेळी दाबोळी विमानतळावर दाखल झाल्या. दोन्ही नेते दिल्लीचेच. त्यात अलका लांबा आप च्या माजी आमदार. दोघांच्या एकाच वेळी आगमनाचा योग साधल्याने दाबोळी विमानतळावरच राजकीय वातावरण तापले.
विधानसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्याने काँग्रेस, भाजपा, आम आदमी, तृणमुल काँग्रेस अशा राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या गोव्यातील फेऱया वाढलेल्या आहेत. त्यामुळे दाबोळी विमानतळ राजकीय आखाडा होऊ लागलेला आहे. नेत्यांचे स्वागत आणि निरोपासाठी स्थानिक नेते आणि कार्यकर्ते दाबोळी विमानतळावर जमत असतात. यात काही वेळा दोन राजकीय पक्षांचे नेते एकाच वेळी दाखल होण्याचेही प्रकार घडतात. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या गोवा भेटी तर नित्याच्याच झालेल्या असून रविवारी दुपारीही त्यांचे गोव्यात आगमन झाले. योगायोग असा की अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीच्या माजी आमदार आणि काँग्रेसच्या विद्यमान प्रवक्त्या अलका लांबा एकाच विमानातून गोव्यात दाखल झाल्या. दोन्ही नेत्यांच्या स्वागतासाठी त्यांचे नेते आणि कार्यकर्ते दाबोळी विमानतळावर स्वागतासाठी हजर होते. त्यामुळे आम आदमी पार्टीच्या नेते व कार्यकर्त्यांनी काही प्रमाणात शक्तीप्रदर्शनही केले. आम आदमी पार्टीने रविवारी दाबोळी विमानतळावर मोठय़ा प्रमाणात गर्दी जमवली होती.
त्या शक्तीप्रदर्शनाला अलका लांबा यांनीही जबरदस्त उत्तर देण्याचा प्रयत्न केला. प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडले. अरविंद केजरीवाल दिल्लीचे एक अपयशी मुख्यमंत्री अशी खिल्ली त्यांनी उडवली. काँग्रेसने गेल्या पाच वर्षांत गोव्यातील जनतेच्या प्रश्नावर सरकारशी संघर्ष केला आहे. तर आप भाजपाची बी टीम बनून काँग्रेसविरोधी मतांची विभागणी करण्यासाठी आलेली आहे. गोव्याला बाहेरच्या पक्षांची गरज नाही. गोव्यातील लोक गोवा चालवण्यासाठी सक्षम आहेत. अरविंद केजरीवाल यांनी गोव्याचा वापर प्रयोगशाळा म्हणून करू नये. आधी दिल्लीकडेच लक्ष द्यावे. तेथे महिलांवर अत्याचार होत आहेत. हवा पाणी विषारी बनलेले आहे. आपण दिल्लीचीच असून दिल्लीबाबत स्थानिक लोकांची दिशाभूल होऊ देणार नाही असे अलका लांबा यांनी स्पष्ट केले.
याचवेळी दुसऱया बाजुला आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते देश का नेता कैसा हो अशा जोरदार घोषणांनी केजरीवाल यांचे स्वागत करीत होते. त्यामुळे राजकीय वातावरण बरेच तापले. आपचे नेते आणि माजीमंत्री महादेव नाईक यांनी माध्यमांशी बोलताना गोव्यातील भाजपा सरकारवर अपयशाचा ठपका ठेवला. त्यामुळे आप हाच गोव्यासाठी योग्य पर्याय असल्याचे स्पष्ट करून त्यांनी दिल्ली सरकारने राबवलेल्या विविध योजना व लोकांचे साधलेले हित या गोष्टींची माहिती देत गोव्यातही आप चे सरकार अशा पध्दतीच्या योजना राबवून लोकांची सेवा करेल अशी ग्वाही दिली.