तस्करीसाठी विशेष हवाई सेवेचाही वापर
प्रतिनिधी/ वास्को
zदाबोळी विमानतळावर कस्टम विभागाने केलेल्या कारवाईत सुमारे साडे पंधरा लाख रूपये किमतीचे तस्करीचे सोने जप्त करण्यात आले. हे सोने दुबईहून भारतात आणण्यात आले होते. हे सोने 345 ग्रॅम वजनाचे आहे. सदर सोने विमानातील सीटखाली आढळून आले. मात्र, संशयीत हवाई प्रवासी कोण हे उघड होऊ शकले नाही.
31 ऑक्टोबरच्या रात्री दाबोळी विमानतळावरील गोवा कस्टम विभागाच्या पथकाला तस्करीच्या सोन्याबाबत माहिती मिळाली होती. त्यामुळे या पथकाने हवाई प्रवाशांवर पाळत ठेवली होती. परंतु हवाई प्रवाशांच्या तपासणीत तस्करीचे सोने कुणाकडेच आढळून आले नाही. त्यामुळे कस्टमच्या पथकाने दुबईहून थेट गोव्यात दाखल झालेल्या इंडिगो एअरलाईन्सकडे आपला मोर्चा वळवला. या विमानाच्या तपासणीत या पथकाला विमानातील एका आसनाखाली लपवलेल्या अवस्थेत सोने आढळून आले. हे सोने कांडय़ांच्या स्वरूपात होते. 345 ग्रॅम वजनाचे हे तस्करीचे सोने थेट दुबईहूनच गोव्यात आणण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या सोन्याची किंमत 15 लाख 42 हजार रूपये एवढी आहे. कस्टम विभागाने हे सोने ताब्यात घेतले. मात्र, या सोन्याची विदेशातून वाहतुक करणारा संशयी प्रवासी कोण हे उघड होऊ शकले नाही. हे विमान पुन्हा मुंबईला उड्डाण करणारे होते. त्यामुळे सीटखाली लपवलेल्या सदर तस्करीच्या सोन्याची वाहतुक पुन्हा मुंबईकडे होणार होती असा संशय आहे.
सोन्याच्या तस्करीविरूध्द करण्यात आलेली ही कारवाई गोवा कस्टम विभागाचे आयुक्त व संयुक्त आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली व दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाचे साहाय्यक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
विशेष हवाई सेवांचाही तस्करीसाठी वापर आतापर्यंत अडिच कोटी रूपये किमतीचे सोने जप्त
देशात अद्याप आंतरराष्ट्रीय प्रवासी हवाई वाहतुक सुरू झालेली नाही. मात्र, देश विदेशात अडकलेल्या हवाई प्रवाशांच्या सोयीसाठी मागच्या सात महिन्यांपासून सुरू असलेल्या विशेष हवाई सेवाअंतर्गंत हे विमान दाबोळी विमानळावर उतरले होते. मागच्या सात महिन्यांच्या लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक बंद राहिल्याने तस्करीची एकही घटना नोंद झाली नव्हती. मात्र, तस्करांनी सोन्याच्या तस्करीसाठी विशेष आंतरराष्ट्रीय सेवेचाही आधार घेणे आता सुरू केल्याचे या सोन्याच्या तस्करीच्या घटनेमुळे उघडकीस आले आहे. गोवा कस्टम विभाग या घटनेचा अधिक तपास करीत आहे.
दरम्यान, गेले सात महिने आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासी सेवा बंद असूनही दाबोळी विमानतळावर जानेवारी 2020 पासून आतापर्यंत साडे सहाहून अधिक किलो वजनाचे व अडिच कोटी रूपये किमतीचे सोने जप्त करण्यात आल्याची माहिती गोवा कस्टम विभागाने जारी केली आहे.