हवाई प्रवाशाला अटक, कस्टम विभागाची कारवाई
प्रतिनिधी / वास्को
गोवा कस्टम विभागाने दाबोळी विमानतळावर केलेल्या कारवाईत सुमारे 58 लाख रुपये किमतीचे तस्करीचे सोने जप्त करण्यात आले. कस्टमने या प्रकरणी एका केरळ व्यक्तीला अटक केलेली असून त्याचे नाव नवास असे आहे. हा हवाई प्रवासी शारजाहून गोव्यात दाखल झाला होता.
काल शुक्रवारी सकाळी दाबोळी विमानतळावरील कस्टमच्या पथकाने तपासणीच्या दरम्यान ही कारवाई केली. कस्टम विभागाने यासंबंधी दिलेल्या माहितीनुसार गोवा कस्टम विभागाचे साहाय्यक आयुक्त व्हा.बी. सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. नवास हा आंतरराष्ट्रीय प्रवासी शारजाहून एअर अरेबियाच्या विमानाने दाबोळी विमानतळावर उतरला होता. हा प्रवासी केरळच्या कासारगोड येथील रहिवासी आहे. दाबोळी विमानतळावर उतरताच त्यांच्या सामानाची तपासणी केली असता, त्याच्या बॅगेमध्ये कस्टमच्या पथकाला संशयास्पद काही तरी असल्याचा संशय आला. त्यांनी त्या प्रवाशाची बॅग उघडून पाहिली असता त्यात सोन्याच्या 11 बिस्किटा सापडल्या. सोन्याची प्रत्येक बिस्किट 10 तोळय़ांची असून या सोन्याचे एकूण वजन 1276 ग्रॅम एवढे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या सोन्याची किंमत जवळपास 58 लाख रुपये आहे.
कस्टमने हे तस्करीचे सोने जप्त करून सदर हवाई प्रवाशाला अटक केली आहे. या कारवाईसाठी कस्टमच्या पथकाला कस्टमच्या सह आयुक्त एम.एस. मिना तसेच कस्टमचे आयुक्त व्ही. सुंदरराजन यांचेही सहकार्य लाभले. कस्टमने प्रसिद्धीस दिलेल्या माहितीनुसार 2021 या वर्षात कस्टमने दाबोळी विमानतळावर आतापर्यंत 2 कोटी 89 लाख रुपये किमतीचे तस्करीचे सोने जप्त केले आहे.