प्रतिनिधी / वास्को
दाबोळी विमानतळासमोरील ग्रेड सेपरेटर उड्डाण पुलाच्या प्रकल्पाचे काम 99 टक्के पूर्ण झालेले असून उर्वरीत काम दोन दिवसांत पूर्ण होईल. त्यामुळे या उड्डाण पुलासंबंधी मुख्यमंत्र्यांकडे चर्चा करून तो वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती वाहतुक मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.
दाबोळी विमानतळाचे संचालक गगन मलिक, मुरगांवचे उपजिल्हाधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी परेश फळदेसाई, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक पी. एस. दोडामणी, जीएसआयडीसीचे सरव्यवस्थापक दिलीप जोशी व इतरांच्या उपस्थितीत मंत्री माविन गुदिन्हो यांनी ग्रेड सेपरेटर प्रकाल्पाच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी या प्रकल्पाबाबत पत्रकारांना माहिती दिली.
मंत्री गुदिन्हो म्हणाले की, वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी दाबोळी विमानतळासमोर ग्रेड सेपरेटर पुलाची काळाची गरज आहे. विमानतळावरून प्रवेश करताना व बाहेर पडताना वाहतुकीवर ताण येतो. विशेषतः सकाळी व सायंकाळी तसेच शाळेच्या वेळी याठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. ही समस्या आता हा प्रकल्प पूर्ण झाल्याने सुटणार आहे. या प्रकल्पाचे 99 टक्के काम पूर्ण झालेले असून केवळ 1 टक्के काम शिल्लक आहे. मुख्यमंत्री सावंत यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा प्रकल्प कार्यान्वित करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे मंत्री गुदिन्हो यावेळी म्हणाले.
आतापर्यंत राज्य सरकारच्या सर्व खात्यांनी कोरोना संकटाविरूध्द चांगले कार्य केलेले आहे. कोविड 19 चे संकट दूर झाल्यानंतर दाबोळी विमानळाच्या आसपासची नियोजित सुशोभिकरणाची कामेही सुरू होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
दाबोळी विमानतळ परिसरातील कचरा व्यवस्थीत हाताळण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे 1 कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. ते म्हणाले की पक्ष्यांची धडक हा गंभीर प्रश्न आहे आणि अत्याआधुनिक कचरा प्रकल्प सुविधा सुरू झाल्यानंतर हा प्रश्न सुटेल. या कामासाठी निविदा मागविण्यात आल्या असून येत्या सहा ते आठ महिन्यात या प्रकल्पाच्या कामाला सुरवात होईल असे ते म्हणाले.
माविन गुदिन्हो यांनी दाबोळी विमानतळावरील सुशोभिकरणासाठी कॉर्पोरेट हाऊस व उद्योजकांना आर्थीक सहाय्य करण्याचे आवाहन केले.