प्रतिनिधी / वास्को
दाबोळी विमानतळासमोरील नाक्यावर 42 कोटी खर्चून उभारण्यात आलेल्या ग्रेड सॅपरेटर उड्डाण पुलाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनामुळे हा उड्डाण पुल आता वाहतुकीसाठी खुला झालेला आहे. या उड्डाण पुलाचा प्रामुख्याने दाबोळी विमानतळावर येणाऱया जाणाऱया वाहतुकीला उपयोग होणार आहे.
मंगळवारी दुपारी विमानतळासमोरील नाक्यावरच आयोजित केलेल्या छोटय़ाशा कार्यक्रमात या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो, आमदार कार्लुस आल्मेदा, आमदार एलिना साल्ढाना, आमदार जोशुआ डिसोजा, मुरगावचे नगरसेवक, चिखली व बोगमाळो पंचायतीचे सरपंच तसेच पंच तसेच विमानतळ संचालक गगन मलीक व शासकीय अधिकारी उपस्थित होते.
कोरोनाचा सामना करताना आम्हाला विकासातही पुढे जायचे आहे
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी बोलताना दाबोळी विमानतळावरील उड्डाण पुल हा उत्कृष्ठ प्रकल्प असल्याचे सांगून त्याचा लाभ पूर्ण गोव्याला होणार असल्याची माहिती दिली. असे अनेक प्रकल्प गोव्यात होत असून लवकरच या प्रकल्पांचे काम पूर्ण होऊन ते लोकांसाठी उपलब्ध करण्यात येतील. कोरोना संकटामुळे अर्थ व्यवस्थेला झळ बसली हे खरे आहे. लॉकडाऊनमुळेही विकास कामांवर परीणाम झाला. मात्र, सरकार विकासकामे पूर्ण करेल. सरकारने कोरोना संकटाचा सामनाही चांगल्या पध्दतीने केलेला आहे. चांगले व्यवस्थापन केलेले आहे. काहींनी शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षांचेही राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या काळातही परीक्षा घेऊन सरकारने एक चांगला धडा इतरांना दिलेला आहे. आम्हाला कोरोनाचा सामना करायच आहेच. आणि त्याचबरोबर विकासही करायचा आहे. आम्हाला विकासात पुढे जायचे आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी त्यांनी कोरोनाविरूध्द लस शोधण्यासाठी देशात अहोरात्र संशोधन चाललेले असून कोरोनाविरोधी लस ही भारतातच निर्माण होईल असा विश्वास व्यक्त केला.
मनोहर पर्रीकरांनी दिलेल्या प्रकल्पांची पूर्तता झाली
वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो यांनी यावेळी बोलताना दाबोळी मतदारसंघासाठी करण्यात आलेल्या विकास कामांची माहिती दिली. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकरांनी दिलेल्या सर्व प्रकल्पांची पूर्तता झाल्याचे त्यांनी सांगितले. जॉगर्स पार्क, वाडेचा तलाव, चिखलीचे पंचायत घर तसेच ग्रेड सॅपरेटर उड्डाण पुलाचा त्यांनी उल्लेख केला. आता दाबोळीत जलतरण तलाव व विमानतळासमोर सौदर्यीकरण होणे आवश्यक असल्याचे ते महणाले. गोव्यात आता रस्ते बांधणी आणि जोडणी चांगल्या पध्दतीने झालेली असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी झुआरी नदीवरील नवीन पुल लवकर पूर्ण होण्यासाठी अधिक भर देण्याची मागणी केली. दाबोळीतील ग्रेड सॅपरेटर उड्डाण पुल पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त करून या मतदारसंघात आणखी विकास कामे होणार असल्याचे ते म्हणाले. येथील कचऱयाच्या विल्हेवाटीची समस्याही मिटणार आहे. विमानतळ प्राधिकरणाने त्यासाठी सहकार्य केलेले आहे. चिखली पंचायतीने 4 हजार चौ. मि. जमीन कचरा विल्हेवाट प्रकल्पासाठी उपलब्ध केलेली आहे. ही समाधानाची गोष्ट असल्याचे मंत्री गुदिन्हो म्हणाले.
या उद्घाटन समारंभानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दाबोळी विमानतळाला भेट दिली. कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर विमानतळावर करण्यात आलेल्या व्यवस्थेची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी चिखली येथील उपजिल्हा हॉस्पिटल व तेथील कामाची पाहणी केली.