प्रतिनिधी / वास्को
राज्य सरकारने जारी केलेल्या नवीन आदेशानुसार वास्को रेल्वेस्थानक तसेच दाबोळी विमानतळावर उतरणाऱया प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय स्थानिक शासकीय अधिकाऱयांनी घेतला आहे.
वास्कोतील रेल्वे स्थानकात यापूर्वीही प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात येत होती. मात्र, नंतर रेल्वे सेवाच बंद झाली. दाबोळी विमानतळावरही उतरणाऱया देशी विदेशी प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात येत होती. दोन महिन्यांपूर्वी ही तपासणी बंद करण्यात आली होती. राज्य सरकारने यासंबंधी नव्याने आदेश काढल्याने दाबोळी विमानतळावर काल बुधवारपासून पुन्हा गोव्यात उतरणाऱया हवाई प्रवाशांची थर्मल स्कॅनिंग आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे.
आज गुरूवारी सकाळपासून वास्कोतील रेल्वे स्थानकावरही प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. वास्को रेल्वे स्थानकावरून होणारी लोकल रेल्वे सेवा सध्या बंदच आहे. आंतरराज्य रेल्वेसेवांपैकी केवळ गोवा ते दिल्ली निजामुद्दीन एक्सप्रेस व यशवंतपूर एक्सप्रेस या दोन रेल्वेसेवा सुरू करण्यात आलेल्या आहेत. या रेलगाडय़ा सकाळी सहानंतर वास्को रेल्वे स्थानकात दाखल होतात. काल बुधवारी मुरगावचे मामलेदार व इतर अधिकाऱयांनी रेल्वेस्थानकात तपासणी व्यवस्थेच्या दृष्टीने पाहणी केली.