वार्ताहर /दाभाळ
भूमिपुत्र अधिकारिणी विधेयक गोव्यासाठी ऐतिहासिक असून सावर्डे मतदारसंघ व धारबांदोडा तालुक्यातील नागरिकांच्या ते फायद्याचे आहे. काही समाजविरोधी संघटना व राजकीय पक्षांच्या विरोधाला बळी न पडता त्यातील काही त्रुटी दूर करुन सरकारने हे विधेयक संमत करावे, असा एकमुखी ठराव कळसई दाभाळ येथील सभेत घेण्यात आला. सावर्डे मतदारसंघ भूमिपुत्रांचा एल्गार या बॅनरखाली कळसई येथे आयोजित केलेल्या या सभेला सावर्डे मतदारसंघ व धारबांदोडा तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.
विधेयकाला समर्थन देण्यासाठी ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. गोवा मुक्तीच्या हिरक महोत्सवी वर्षांत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपा सरकारने हे विधेयक आणून भूमिपुत्रांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी हे सरकार अभिनंदनास पात्र असल्याचे सभेतील वक्त्यांनी बोलून दाखविले. विधेयकाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या.
व्यासपीठावर प्रमुख वक्ते म्हणून खोतोडा वाळपई येथील समाज कार्यकर्ते राजेश गावकर, दाभाळच्या सरपंच शकुंतला गावकर, दक्षीण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर, सावर्डेचे सरपंच संदीप पाऊसकर, साकोर्डाचे सरपंच दिनानाथ गावकर, कालेचे उपसरपंच विराज वेरेकर, धारबांदोडाचे माजी सरपंच गुरु गावकर आदी उपस्थित होते.
गोवा मुक्त होऊन साठ वर्षे होत आली तरी, प्रामुख्याने सावर्डे मतदार संघातील जमीन मालकी हक्काचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. त्यासाठी जनता गेली साठ वर्षे संघर्ष करीत आहे, असे राजेश गावकर म्हणाले. सरकारने मंजूर केलेले विधेयक सावर्डे मतदार संघातील नागरिकांच्या भल्यासाठी आहे, हे कुणीही नाकारु शकरणार नाही. सावर्डे मतदार संघातील 90 टक्क्याहून अधिक घरांना जमिन मालकी हक्क नसल्याने बेकायदेशीर ठरतात. सरकारच्या जाचक अटी पूर्ण करुनही आपली घरे कायदेशीर करणे नागरिकांना कधीच शक्य झाले नाही. यापुढेही होणार नाही. त्यासाठीच सरकारने ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांची ही अडचण दूर करण्यासाठी पूर्ण विचाराअंती हे विधेयक आणले आहे. त्यासाठी हे विधेयक संमत होणे अत्यंत गरजेचे आहे. सावर्डे मतदार संघातील सर्व नागरिकांनी या विधेयकाला पाठिंबा देण्याचे आवाहन गावकर यांनी केले.
विधेयकात काही त्रुटी असल्यास त्या दुरुस्त कराव्यात, पण विधेयक रद्द करु नये अशी मागणी त्यांनी केली. या विधेयकाला विरोध करणाऱया सामाजिक संघटना व राजकीय नेत्यांनी केवळ राजकीय हेतुने विरोध न करता सखोल अभ्यास करावा. या विधेयकाचा जास्त फायदा बिगर गोमंतकीयांना होणार आहे, अशा अफवा सामाजिक माध्यमातून पसरविल्या जात आहेत. त्याला लोकांनी बळी पडू नये. हे विधेयक चुकीचे असल्यास त्यावर समोरासमोर जाहीर चर्चा करण्यासाठी पुढे यावे असे आवाहनही त्यांनी केले. गावागावांत या विषयावर जनजागृती करा. तसेच सरकारने या विधेयकात काही त्रुटी असल्यास त्या दूर करण्याच्या सूचना मागितल्या आहेत. त्यासाठी सरकारच्या संकेतस्थळावर जाऊन आपापल्या सूचना मांडाव्यात असेही गावकर यांनी सांगितले. उपस्थित नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांन त्यांनी उत्तरे दिले.
संदीप पाऊसकर म्हणाले, सरकारने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे. सावर्डे मतदार संघातील जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा होणार आहे. त्यासाठी या विधेयकाचे सर्वांनी समर्थन करण्याचे आवाहन त्यांनी केले. इतरांनीही विधेयकाच्या समर्थनार्थ आपले विचार मांडले. गुरु गावकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. दिव्या गावकर यांनी सूत्रसंचालन तर दिनानाथ गावकर यांनी आभार मानले.