नांगरून ठेवलेली नौका पेटली, सुमारे सहा लाखाचे नुकसान
वार्ताहर/ दाभोळ
दाभोळ खाडीमध्ये नांगरून ठेवलेल्या ‘श्री ओम पार्वती पांडुरंग प्रसाद‘ बोटीला मंगळवारी सायंकाळी 8 च्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत बोट 40 टक्के जळल्याने सुमारे 6 लाखाचे नुकसान झाले. वाऱयामुळे भडकलेली आग आजूबाजूला असणाऱया नौकांवरील मच्छीमार बांधवांनी आटोक्यात आणली. यामुळे खाडीत थरार अनुभवायला मिळाला.
लॉकडाऊनमुळे दाभोळ खाडीमधील मासेमारी जवळजवळ बंदच आहे. मात्र शासनाने मासेमारीवरील निर्बंध उठवल्यामुळे काही मच्छीमार बांधवांनी आपापल्या बोटी मासेमारीसाठी तयारीत ठेवलेल्या आहेत. तेरेवायंगणी येथील चंद्रकांत शिगवण यांनी ‘श्री ओम पार्वती पांडुरंग प्रसाद’ ही नौका तांबडे मोहल्ल्यासमोरील खाडीत नांगरून ठेवली होती. मध्यप्रदेशमधील निरज कुमार आणि कल्लू कुमार हे या नौकेवर खलाशी म्हणून कार्यरत आहेत. कल्लू मालकाबरोबर काही कामानिमित्त नौकेतून खाली उतरला होता. नौकेवर नीरज जेवण बनवत असताना ही आग लागली. अचानक लागलेल्या आगीने भांबावलेल्या नीरजने आग विझवण्याचे प्रयत्न केले, मात्र आग आटोक्याबाहेर गेल्याने त्याने खाडीत उडी मारली.
आगीमुळे नौकेच्या नांगराची दोरी जळल्याने व भरती असल्याने नौका खाडीच्या वरच्या बाजूला जाऊ लागली. बोटीला आग लागल्याचे लक्षात येताच आजुबाजूला नौका मालकांनी आपल्या नौका मदतीसाठी वळवल्या. याचवेळी वेगवान वारा असल्याने आगीने अधिक रौद्र रूप धारण केले. अथक प्रयत्नानंतर त्यांना आग विझवण्यात यश आले. अर्धवट जळलेली ही नौका रात्री 9.30 च्या सुमारास फड बंदरात आणण्यात आली. यासाठी दाभोळच्या सुनील कदम यांची ‘श्री लंबोदर’, रियाज मतरोजी यांची ‘अलहमिदा’, तरिबंदरच्या ‘दत्तछाया’, ‘नंदयशोदा’ आदी नौकांनी प्रयत्न केले. दाभोळ सागरी पोलीस स्थानकाची गस्ती नौकाही त्यांच्या मदतीला होती. फड बंदरला आणल्यानंतरही नौका बराचवेळ धुमसत होती. ही आग स्टोव्हचा भडका उडाल्यामुळे लागल्याचे बोलले जात आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक सुनील पवार, उपनिरीक्षक महेश टेमकर, स्वप्निल पवार, श्रीनिवास जानवलकर, मधुकर गायकवाड, मत्स्य विभागाचे सागरी सुरक्षा रक्षक योगेश तोसकर, ग्रामपंचायत सदस्य उदय जावकर, पोलीस पाटील बापू कुडाळकर आदी उपस्थित होते.