वार्ताहर/ दाभोळ
जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या आदेशावरून प्रभारी पुरवठा निरीक्षक तथा नायब तहसीलदार स्मिता घडशी यांनी रास्त धान्य दुकानांतील धान्य वाटपातील अपहार प्रकरणी दापोली तालुक्यातील दाभोळमधील तिन्ही रास्त धान्य दुकानांचे परवाने रद्द केले आहेत.
तसेच तातडीची उपाययोजना म्हणून दुकान क्र. 1 व 2 ही वणौशी धान्य दुकानाला, तर क्र. 3चे धान्य दुकान भाटी येथील धान्य दुकानाला जोडले असल्याचे घडशी यांनी सांगितले. शासनाच्या या कारवाईने ग्राहकांतून समाधान व्यक्त होत आहे. मात्र धान्यासाठी अनेक कि. मी.ची दगदग करावी लागणार असल्याने ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे. मात्र या परिस्थितीत दाभोळ ग्रामपंचायतीची भूमिका निद्रिस्तासारखी आहे.
या अपहार प्रकरणी श्याम दाभोळकर यांच्यासह 133जणांनी तहसील कार्यालयात तक्रारी दाखल केल्या होत्या. त्याअनुषंगाने प्रभारी पुरवठा निरीक्षक, तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी यांनी वेळोवेळी दाभोळला भेट देऊन ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. त्यानंतर तहसीलदारांनी आपला अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवला. यानंतर जिल्हा पुरवठा अधिकाऱयांनी रास्त धान्य दुकान क्र. 1, 2 व 3 यांचे परवाने रद्द करण्याचे आदेश दिले. तसेच लाभार्थी नसणाऱया केशरी कार्डधारकांना वाटल्या गेलेल्या 2825 किलो धान्याचे 33 रुपये प्रतिकिलो याप्रमाणे 93225 रुपये जमा करण्याचे आदेश दिले. शिधावस्तूंचा काळाबाजार, मालाची अफरातफर आदी गंभीर बाबी केल्यामुळे रास्त धान्य दुकान चालक अध्यक्ष- अंजनीमाता स्वयंसहाय्यता बचत गट, व्यवस्थापक व सेल्सवुमन यांच्यावर भा. दं. वि. कलम 419, 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा, तसेच कलम 34 सह जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 कलम 3,7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
यावेळी तहसील कार्यालयाच्या प्रभारी पुरवठा अधिकारी स्मिता घडशी, दाभोळ सागरी पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पवार, पी. एन. सूर्यवंशी, पोलीस पाटील बापू कुडाळकर, तलाठी सुहास सुपल, अंजनीमाता स्वयंसहाय्यता बचत गटाच्या काही सदस्या, वणौशीचे रास्त धान्य दुकान चालक अनील मोरे यांच्यासह भाटी रास्त धान्य दुकान चालक, आदर्श स्वयंसहाय्यता बचत गटाचे प्रतिनिधी, पोलीस, ग्रामपंचायत कर्मचारी व काही ग्रामस्थ उपस्थित होते.