‘कोण होणार करोडपती’मध्ये मूळ दारिस्तेमधील पिंटू शिरसाटची चमक : अनारदे फाऊंडेशनमध्ये आहे कार्यरत
चंद्रशेखर देसाई / कणकवली:
ग्रामीण विकासाच्या कामात हातभार लावणाऱया मुंबईतील ‘अनारदे फाऊंडेशन’मध्ये प्रकल्प समन्वयक म्हणून काम करणारा तालुक्यातील दारिस्तेमधील दिलीप शिरसाट हा होतकरु तरुण. दुसऱयाची हुबेहूब नक्कल, हुबेहूब हस्ताक्षर काढण्याची दैवी देणगीच त्याला लाभलेली. पक्षी, प्राण्यांचे आवाजही तो लिलया काढतो. नोकरी करतानाच अभिनेते सचिन खेडेकर संचलित सोनी मराठीच्या ‘कोण होणार करोडपती’मध्ये नशीब अजमावण्याची संधी नुकतीच त्याला मिळाली. या संधीचे सोने करत 11 व्या प्रश्नापर्यंत बिनचूक जात या तरुणाने ‘लखपती’ बनण्याचा बहुमान मिळविला. आपण कार्यरत असलेल्या संस्थेच्या माध्यमातून सिंधुदुर्गमध्ये सुरू असलेले काम अजून जोमाने करून ग्रामविकासासाठी हातभार लावण्याचा मानस असल्याचे त्याने तरुण भारतशी बोलताना सांगितले.
तालुक्यातील दारिस्ते येथील दिलीप उर्फ पिंटू महादेव शिरसाट असे या तरुणाचे नाव आहे. पहिली ते तिसरीपर्यंतचे शिक्षण मुंबईत झाले. वडील न्यासनोंदणी कार्यालयात लिपिक असल्याने त्यानंतर तो सिंधुदुर्गमध्ये आला. चौथी ते बारावीपर्यंतचे त्याचे शिक्षण जि. प. कसाल-कुंभारवाडी व कसाल हायस्कूलमध्ये झाले. छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय किर्लोस येथून त्याने कृषी पदवी मिळविली आहे.
बघितलेले हस्ताक्षर हुबेहूब काढणे, एखाद्याची हुबेहुब नक्कल करणे हा त्याच्या भाषेत सांगायचा, तर ‘अवगुण’ त्याच्यात पहिल्यापासूनच आहे. तो पक्षी, प्राण्यांचे आवाजही काढतो. पण, एखाद्याचे अक्षर बघून तसेच अक्षर काढणे किंवा एखाद्याची लकब लक्षात ठेऊन त्याच पद्धतीत नक्कल करणे ही साधी गोष्ट नाही. यासाठी दैवी देणगीच असावी लागते. ही देणगी पिंटूला लाभलेली आहे.
पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने काही काळ एमआरईजीएस अंतर्गत तांत्रिक अधिकारी म्हणून कामही केले. त्यानंतर मुंबईत घरची रुम असल्याने मुंबईत जाऊन नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला. मुंबईत तो सध्या अनारदे फाऊंडेशनमध्ये प्रकल्प समन्वयक म्हणून कार्यरत आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून कणकवली तालुक्यात करुळ येथे शौचालयाचे काम करण्यात आले असून अजून काही काही कामेही प्रस्तावित आहेत. आवळेगाव येथेही काम प्रस्तावित आहे. संस्थेच्यावतीने संपूर्ण ग्रामीण विकासाची कामे होतात. यात बचतगटांना ऍक्टिव्ह करणे, पाणीसाठा वाढविणे, भाजीपाला बी-बियाणे, वृक्ष लागवड, शाळा देखभाल दुरुस्ती आदी कामांसाठीही हातभार लावला जातो. शालेय मुलांसाठी परसबाग, बंधारे आदी कामेही केली जातात.
पिंटू शिरसाट याला नवनवीन काही प्रयत्न करण्याची मोठी हौस आहे. यातूनच ‘कोण होणार करोडपती’ हा शो जाहीर होताच तो तेथेही प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करीत असताना त्याची निवड झाली व त्याची मुलाखत झाली. त्यातून तो पुढे गेला. या मुलाखतीवेळी सुमारे सात लाख लोकांमधून ही निवड झाल्याचे आपणाला सांगण्यात आल्याचे तो अभिमानाने सांगतो. त्यानंतर नुकत्याच झालेल्या या शोमध्ये त्याने 6 लाख 40 हजार रकमेच्या अकराव्या प्रश्नापर्यंत झेप घेत लखपती होण्याचा बहुमान मिळविला. बाराव्या प्रश्नाचे उत्तर त्याला येत होते, पण 100 टक्के खात्री नसल्याने त्याने थांबण्याचा निर्णय घेतला. त्याने अंदाज व्यक्त केलेले ते उत्तरही बरोबर होते. मात्र, तरीही सिंधुदुर्गच्या या होतकरु तरुणाने ज्या जिद्दीने हा टप्पा पार केला, त्याबद्दल त्याचे कौतूकच करायला हवे.
याबाबत पिंटू शिरसाट याच्याशी संपर्क साधला असता तो सांगतो, बक्षिसाच्या रकमेपेक्षा मला यात खेळता आले हे अधिक भाग्याचे आहे. आम्ही कार्यरत असलेल्या संस्थेच्या माध्यमातून केले जाणारे काम यानिमित्ताने पुढे आले आहे. आमची संस्था ग्रामविकासाच्या कामाला हातभार लावते. राज्यातील अनेक जिल्हय़ातून लोक संस्थेकडे मदत मागण्यासाठी येतात. पण, आपले लोक कमी येतात. संस्थेच्या माध्यमातून अशा विकासकामांना हातभार लावण्याची संधी असून त्याचा उपयोगही करून घेतला पाहिजे.
फोटोग्राफीचाही छंद
पिंटू शिरसाट याला फोटोग्राफीचाही छंद आहे. त्याने गतवर्षी काढलेल्या एका फोटोला सोनी बीबीसी अर्थच्या नॅचरल फोटोग्राफी स्पर्धेमध्ये पहिल्या 100 फोटोमध्ये स्थान मिळाले होते.