संसर्गामुळे घरातील कर्ते पुरूष गमावल्याची खंत
कोल्हापूर / कृष्णात पुरेकर
घरात लग्नाची तयारी..मुहुर्तमेढ रोवलेली.. अन् कर्ता पुरूष पॉझिटिव्ह आला, त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. घरातील सर्वांची ऍटीजेन झाली, अन् दुसरा भाऊही पॉझिटिव्ह आला. पंधरा दिवसांच्या अंतरानं कोरोनानं दोघांना गाठलं.. लगीनघाईत दुःखाचा खडा पडला. अन् दोन कर्त्या पुरूषांना कुटुंबानं गमावलं. कोरोनाची ही पहिली ब्लॅक शॅडो.. भाजी विक्रीसाठी तो मंडईत गेला अन् कोराना घरी आला.. किरकोळ म्हणून अंगावर काढलं अन् आठ दिवसांत कोरोनानं तो देवाघरी गेला.. पत्नीसह दोन मुलांना मागे ठेवून..!
सनईचा सूर.. अन् दारी मुहुर्तमेढ…अशातच परगावातून आलेल्या मुलाला ताप आला. किरकोळ गोळ्या घेत त्याने उपचार घेतले. त्याच्याद्वारे कोरोनाचा संसर्ग इतरांना झाला. घरातील सत्तरवर्षीय चुलत्यांना संसर्ग झाला, त्यांना अत्यवस्थ स्थितीत सीपीआरमध्ये दाखल केलं. एकीकडे काळजी अन् दुसरीकडे लग्नाची तयारी.. सीपीआरमध्ये मुलांच्या फेऱया वाढल्या. चुलत्यांची प्रकृती गंभीर बनली. दरम्यान साठवर्षीय धाकटा भाऊही पॉझिटिव्ह आला, सर्वाची अँटीजेन केली.. अन् धाकट्याला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करत अख्खं कुटुंब कोरोंटाईन झालं..!
सख्खे भाऊ कोमॉर्बीड.. त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू.. कोरोना पॉझिटिव्ह मुलावर परगावी केअर सेंटरमध्ये उपचार.. अशा तिहेरी कात्रीत थोरला भाऊ शुगर अन् कोरोनामुळे गेला. उत्साहावर विरजण पडलं. गल्लीत दबक्या आवाजात चर्चा सुरू.. पाच दिवस जातात… तोपर्यत धाकटाही हृदयविकारानं गेला, दारातील मुहुर्तमेढची फांदी सुकून गेली. कोणी विचारलं तर प्रकृती स्थिर आहे..' हे उत्तर.. अन् अखेरीस दोघांबाबतही
क्रिटीकल बनलीय..’ हा अखेरचा निरोप त्या कुटुंबांनं घेतला.. अन् कोरोनानं दोघा कर्त्या पुरूषांना हिरावल्याची खंत व्यक्त झाली.
जिल्ह्यातील दुर्गम डोंगराळ तालुक्यातील अल्पभुधारक चौकोनी कुटुंब. शेतातील भाजीपाला घेऊन कर्ता पुरूष तालुक्याच्या मंडईत आला. भाजीपाला विकून घरी गेला. संध्याकाळपर्यत सारं काही ठिक होतं. रात्री त्याला ताप आला.. अन् बायको हबकून गेली. घरात दोन मुलं. मोठ्या मुलीला सांगून त्याला तालुक्याच्या हॉस्पिटलमध्ये आणलं. तेथेच ऍटीजेन झाली अन् 45 वर्षीय नवरा पॉझिटिव्ह आला. बळ एकवटून ती दवाखान्यात थांबली. चार दिवसांत प्रकृती खालावली अन् त्याला कोल्हापूरच्या थोरल्या दवाखान्यात दाखल केलं.
तो`आयसीयू’मध्ये चेहऱ्यावरील मास्क…डॉक्टरांना सततचं विचारणं.. अन् घराकडील काळजी.. रात्री अचानक ऑक्सिजन कमी झाल्यास समजलं. अन् थोड्याच वेळात तिला वॉर्डमध्ये बोलावलं. बांधलेले हात अन् पायाची सुरू असलेली अनाहूत धडपड.. धाडकन्… अन.. सारं काही शांत.. नीरव शांततेत तिचा दबलेला हुंदका अन् आक्रोश मन कातळून गेला.. बंद पिशवीतून त्याचा देह सरणावर पोहोचला. पाऊस अन् सोसाट्याच्या वाऱयात ज्वाला उठत होत्या.. अन् कोसळणाऱया धारांसमवेत.. तिच्या चेहराही अश्रूंनी थिजून गेला. पंचगंगा स्मशानभुमीत ती बोलती झाली तेव्हा कोरोनाचं दबक्या पावलांनी येणं अन् कर्त्या पुरूषांना हिरावून घेणं..जाणवलं.. त्यापेक्षाही त्यांच्या जाण्यानंतरच.. कुटुंबाचं कोसळणं.. डोळ्यासमोर उभं राहिलं.