प्रतिनिधी / सातारा :
वाढे फाटा (ता. सातारा) येथील तीन मित्रांनी केलेल्या दारु पार्टीनंतर एकाने मित्राच्याच डोक्यात दगड घालून खून केला. सायकल लपविल्याच्या कारणावरुन बुधवारी रात्री उशिरा हि घटना घडली. सूरज मारुती निगडे (वय 35, रा. करिष्मा हाईट्स सदरबझार, सातारा) असे मृत युवकाचे नाव असून याप्रकरणी दीपक विश्वनाथ दया (वय 29, सध्या रा. वाढे फाटा. मूळ रा. नाशिक) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवारी दारु विक्रीसाठी खुली झाल्यानंतर सूरज निगडे, दीपक दया व अन्य एका मित्राने रात्री पार्टीचे नियोजन केले होते. एका झाडाखाली तिघांनीही दारु पिली. त्यानंतर त्यांच्यात सायकल लपवल्यावरून वाद झाला. यातूनच संशयित आरोपी दीपक दया याने सूरज निगडे याच्या डोक्यात दगड घातला. यात सूरज निगडे याचा मृत्यू झाला. दिपक दया पहाटे शुद्धीवर आल्यानंतर सातारा तालुका पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. संशयित आरोपी मुळचा नाशिक जिह्यातील असून तो सध्या वाढे फाटा येथील ढाब्यावर वेटर म्हणून काम करत आहे.
रात्री उशिरा ही घटना समोर आल्यानंतर सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे, सहय्यक पोलीस निरीक्षक अमित पाटील, पोलीस हवालदार राजू मुलाणी, दादा परीहार, सुजित भोसले यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. अधिक तपास पोलीस हवालदार राजू मुलाणी करीत आहेत.