तडवळे येथील प्रकार; आरोपीस तत्काळ अटक
प्रतिनिधी/ कोरेगाव
दारुच्या नशेत जुन्या भांडणाच्या रागातून सख्या भावाने भावाचाच लोखंडी फुकणीने डोक्यात वार करुन खून केल्याची घटना तडवळे (ता. कोरेगाव) येथे गुरुवारी रात्री घडली. सुरेश गुलाब कांबळे (वय 42) असे मृत व्यक्तीचे नाव असून, खून करणाऱयाचे नाव दीपक गुलाब कांबळे (वय 49) असे आहे. याप्रकरणी पोलिसांनी दीपक याला तत्काळ अटक केली आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, तडवळे येथे आंबेडकर नगरमध्ये गुलाब कांबळे हे आपल्या कुटुंबियांसह एकत्रित राहण्यास आहेत. त्यांना दोन मुलगे असून, दीपक हा थोरला तर सुरेश हा धाकटा आहे. दोघेही दारुच्या व्यसनाच्या आहारी गेले असून, दारु पिल्यानंतर दोघांमध्ये सतत भांडण तंटा होत होता. दोघांच्या भांडणाला वडील गुलाब, दीपक याची पत्नी जयश्री, मुलगा राजदीप आणि मुलगी आम्रपाली ही वैतागली होती. सुरेश याचा विवाह झालेला नसल्याने तो घरी फार कमी असायचा.
गुरुवारी सकाळी दीपक हा लवकर घरातून कामासाठी बाहेर निघून गेला, त्यानंतर काही वेळेनंतर सुरेश हा कोरेगावात गेला. दीपक हा 5 वाजता घरी आल्यानंतर सुरेश नावाने शिवीगाळ करत होता, त्याचा आज खून करतोच, अशी धमकी तो वडिलांसह कुटुंबियांना देत होता. नेहमीची भांडणे असल्याने कुटुंबियांनी फार मनावर घेतले नाही. सुरेश हा घरी परतलाच नाही, रात्री तो आंबेडकरनगर परिसरात असलेल्या सिमेंटच्या कट्टय़ावर मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता.
8 वाजण्याच्या सुमारास दीपक हा परत घरी आला, त्याने रागाच्या भरात चूल पुंकण्यासाठी असलेली लोखंडी फुंकणी उचलली आणि आता सुरेशला जीवंत सोडत नाही, असे म्हणत तो घराबाहेर पडला. काही वेळातच त्याने सिमेंटच्या कट्टय़ावर बसलेल्या सुरेशच्या डोक्यात आणि चेहऱयावर पुंकणीने वार करुन खून केला. तो रागाच्या भरात घरी गेला आणि वडील गुलाब यांना शिवीगाळ करत तुला जिवंत सोडत नाही, अशी धमकी देऊ लागला. प्रसंगावधन राखत गुलाब कांबळे हे घरात गेले आणि दाराला आतून कडी लावून घेतली. दीपक या रागारागा दारावर दगड फेकून मारला आणि लोखंडी फुकणी तेथेच टाकून देत गावात निघून गेला.
दीपक याने केलेल्या हल्ल्यात सुरेश हा गंभीर जखमी झाला होता, त्याला कुटुंबातील अन्य सदस्य व नातेवाईकांनी तातडीने खाजगी जीपमधून कोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे त्याची तपासणी केल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर आयपीएस अधिकारी रितू खोखर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे, हवालदार केशव फरांदे, पोलीस नाईक अमोल सपकाळ यांच्यासह पथकाने तडवळे गावात धाव घेतली.
घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर संशयित दीपक याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक याने भाऊ सुरेश याचा खून केला असल्याची कबुली दिली आहे. दीपक कांबळे याला न्यायालयात हजर केले असता, दि. 23 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.