प्रतिनिधी/ सातारा
कोरोना आला आणि लॉकडाऊन सुरु झाला. लॉकडाऊनमध्ये दारु मिळणे दुरापास्त झाले होते. त्यावेळी फलटणमध्ये दारू म्हणून सॅनिटायझर पिवून दोघांचा बळी गेला होता. आता जिल्हय़ात दोन ठिकाणी दोघांनी दारुच्या नशेत सॅनिटायझर पिल्याने त्यांना त्रास झाला. त्यानंतर त्या दोघांना सातारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
याबाबत जिल्हा रुग्णालयातील पोलीस कक्षातून मिळालेली माहिती अशी, दारूच्या नशेत दोघांनी सॅनिटायझर प्राशन केल्याची घटना कराड व सातारा तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या आहेत. यामध्ये पहिल्या घटनेत प्रतीक प्रदीप कोरडे (वय 25, रा. वाघोली, ता. कराड) त्याने दारुच्या नशेत सॅनिटायझर प्राशन केल्याने त्रास सुरु झाला. त्याला नातेवाईकांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलेले आहे.
तर सातारा तालुक्यातील बोरगाव येथे घटनेत रमेश आत्माराम नलवडे (वय 50, रा. बोरगाव, ता. सातारा) यांनी राहत्या घरी दारूच्या नशेत सॅनिटायझर प्राशन केले. त्यानंतर ते अत्यावस्थ झाल्याने नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या दोघांवर सध्या उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले.