प्रतिनिधी/ सातारा
सातारा येथील भूविकास बँक चौकात रात्रीच्यावेळी दारु पिऊन आरडाओरडा करत सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱया सराईत गुन्हेगारास शाहूपुरी पोलिसांनी शनिवारी रात्री जेरबंद केले. दत्ता उत्तम घाडगे असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव असून त्याच्यावर शाहूपरी पोलीस ठाण्यात सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, शनिवार, दि. 26 रोजी रात्री सातारा येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या जवळ भूविकास बँक चौकात एकजण दारु पिऊन आरडाओरडा करत होता. मात्र, संबंधित व्यक्ती कोण आहे, याची माहिती काही मिळत नव्हती. या मार्गावरुन येणाऱया, जाणाऱया अनेकांनी त्याकडे कानाडोळा केला होता. तरीही त्याचा दारु पिऊन त्याचा आरडाओरडा सुरुच होता. दरम्यान, काही जागरुक नागरिकांनी याची माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी, सातारा शहर बीट मार्शलचे कर्मचारी आणि पीसीआर व्हॅन तात्काळ घटनास्थळी दाखल झाली होती.
यावेळीही त्याचा दारु पिऊन आरडाओरडा आणि गोंधळ सुरुच होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता तो शाहुपुरी पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार दत्ता उत्तम घाडगे (रा. दौलतनगर, सातारा) होता. यानंतर त्याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तसेच दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस नाईक सचिन माने यांनी दिली आहे.
तडीपारीचा प्रस्ताव प्रांताकडे पडून दरम्यान, दत्ता घाडगे याच्यावर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी चोरी, घरफोडी, गर्दी, मारामारी, रॉबरी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वीच शाहूपुरी पोलिसांनी त्यास रॉबरीच्या गुह्यात अटक केली होती. आता तो जामिनावर बाहेर आला आहे. शाहूपुरी पोलिसांनी त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव सातारा प्रांतांकडे पाठविला आहे. मात्र, त्यावर पुढे काय झाले, याची माहिती मिळू शकलेली नाही. खूप दिवसांपासून त्याची मंजुरी अडकल्याने त्याचा उच्छाद सुरु असल्याचे नागरिकांनी सांगितले