खून करणारा संशयित ताब्यात
सातारा / प्रतिनिधी:
येथील वाढे फाटा परिसरात वेण्णा नदीच्या लगत बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास एका युवकाच्या डोक्यात दुसऱ्या युवकाने दगड घालून खून केल्याची घटना दुसऱ्या दिवशी उघडकीस आली. सूरज मारुती निगडे (वय 27,रा. करिश्मा हाईट, सदरबझार) असे मृत युवकाचे नाव असून संशयित आरोपी स्वतःहुन सातारा तालुका पोलिसात हजर झाला आहे. हा खून दारू पिण्यावरून झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की सातारा शहरात बुधवारी दारूची दुकाने उघडली गेली. काहींनी दारूचा बेत ही आखला. तसाच बेत सूरज मारुती निगडे आणि दीपक विश्वनाथ दया (वय 28, मूळ रा. नाशिक, सध्या वाढेफाटा) या दोघांनी आखला. सायकांळी सात वाजण्याच्या सुमारास दोघांची मैफिल वेण्णा नदीच्या लगत बसली. एकेक पेग रिचवत दोघांच्या ही डोक्यात नशा चढू लागली. नशेत सायकल देण्याघेण्यावरून वाद सुरू झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. बाजूलाच पडलेला दगड उचलून दीपकने सुरजच्या डोक्यात घातला. एवढे दगडाचे त्याने घाव घातले की सुरजचा चेहरा छिन्न विच्छन झाला आहे. काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. तो महामार्गावर एका ढाब्यावर काम करतो. तेथेच मृत युवकाची ओळख झाली होती. पहाटे जेव्हा दीपक शुद्धीत आला तेव्हा त्याने पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांना घडलेल्या प्रकारची माहिती दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सातारा तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक सज्जन हंकारे, सहाय्यक निरिक्षक अमित पाटील, हवालदार राजू मुल्लाणी अधिक तपास करत आहेत.