प्रतिनिधी/ नागठाणे
अपशिंगे (मि.) येथे सुरू असलेल्या चोरटय़ा दारूधंद्यावर छापा टाकून संशयितासह पोलीस ठाण्याकडे परतणाऱया बोरगावच्या पोलीस पथकावर येथीलच पाच जणांनी दुचाकी आडव्या मारून हल्ला केला. ही घटना गुरुवारी रात्री घडली. या हल्ल्यात 2 पोलीस जखमी झाले आहेत. या प्रकरणी दारूविक्रेत्यासह हल्ला करणाऱया चौघांना पोलिसांनी जेरबंद केले असून एक हल्लेखोर पळून गेला आहे. हल्लेखोरांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तसेच अन्य कलमाद्वारे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
संकेत राजेंद्र निकम ऊर्फ बिच्चू, नितीन नवनाथ निकम, निरंजन नारायण निकम ऊर्फ बाळा, श्रीकांत विलास निकम, ऋषिकेश शंकर सूर्यवंशी ऊर्फ सोन्या (सर्व रा. अपशिंगे (मि.), ता. सातारा) अशी या हल्लेखोरांची नावे असून ओमप्रकाश हरिदास राठोड (रा. अपशिंगे (मि.) असे ताब्यात घेतलेल्या दारूविक्रेत्याचे नाव आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपशिंगे (मि.) येथे ओमप्रकाश राठोड हा चोरून दारूविक्री करत असल्याची माहिती सपोनि डॉ. सागर वाघ यांना समजली. त्यांनी सहाय्यक फौजदार भीमराव यादव, रामचंद्र फरांदे, हवालदार प्रशांत मोरे व सत्यम थोरात यांना छापा टाकण्यास सांगितले. सायंकाळी पोलिसांनी अपशिंगे (मि.) ते वर्णे जाणाऱया रोडलगत छापा टाकून ओमप्रकाश राठोड याला रंगेहाथ पकडून त्याच्याजवळून देशी दारूच्या 39 व बिअरच्या 10 बाटल्या अशा 2414 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
मुद्देमालासह संशयिताला घेऊन हे पथक पुन्हा बोरगावकडे येत असताना अपशिंगे (मि.) गावच्या एसटी थांब्याजवळ तीन दुचाकीस्वारांनी त्यांच्या गाडीच्या आडव्या दुचाकी लावून घेराव घातला. यावेळी संकेत निकम याने ओमप्रकाश राठोड माझा मित्र आहे. तुम्ही त्याच्यावर रेड का टाकली असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी करत पोलीस असलेल्या चारचाकी गाडीवर हल्ला केला. यामध्ये गाडीची काच लोखंडी गज मारून फोडली.
त्याचवेळी त्याच्या इतर साथीदारांनीही पथकावर हल्ला केला. यावेळी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या ओमप्रकाश राठोड याला सोडवून नेण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला. त्यांना अडवत असलेल्या हवालदार प्रशांत मोरे व सत्यम थोरात यांना त्यांनी दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाणही केली. यावेळी पोलिसांनी शिताफीने हल्लेखोरांपैकी नितीन निकम व ओमप्रकाश राठोड याला पकडून बोरगाव पोलीस ठाण्यात आणले. या हल्ल्यात हवालदार प्रशांत मोरे व सत्यम थोरात जखमी झाले.
पोलिसांनी नितीन निकम याच्याकडून उर्वरित हल्लेखोरांची नावे निष्पन्न करत त्यांना रात्री उशिरा ताब्यात घेतले. तर संकेत निकम हा पळून जाण्यात यशस्वी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबीकर करत आहेत.