मिरजेत दारुड्या नवऱ्याचे कृत्य
प्रतिनिधी / मिरज
दारू पिल्याचा पत्नीने जाब विचारल्याने तसेच दारू पिऊ नका असे म्हटल्याने दारुड्या नवऱ्याने पत्नीच्या हातावर चाकु मारून बोटे छाटल्याची घटना शहरातील धुळेश्वर कॉलनी येथे घडली आहे. याबाबत मिनाज महंमद भिलवडे (वय 32) यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली असून, दारुडा पती महंमद पापा भिलवडे (वय 38) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
मिनाज या शनिवारी रात्री दहा वाजता स्वयंपाक करीत होत्या. त्यावेळी महंमद हा दारू पिऊन घरी आला. यावेळी पत्नी मिनाज यांनी दारू का पिऊन आला आहात. इथून पुढे दारू पिऊ नका, असे म्हटले असता, महंमद याने अश्लील शिवीगाळ करून गॅसजवळ असलेला भाजी कापण्याचा चाकु घेऊन मिनाज यांच्या डाव्या हातावर वार केले. या मारहाणीत मिनाज यांच्या हाताची बोटे छाटली आहेत.