राज्यात 34 नव्या संगसर्गबाधितांची भर : रुग्णसंख्या 635 वर
प्रतिनिधी/ बेंगळूर
दुसऱया टप्प्यातील लॉकडाऊन संपतो न संपतो तोच राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येने पुन्हा मोठी उसळी मारली आहे. रविवारी एकाच दिवशी तब्बल 34 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे चार दिवसांपूर्वी ग्रीनझोनमध्ये असलल्या दावणगेरे जिल्हय़ात मागील 24 तासांत 21 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यात खळबळ माजली आहे. त्याचप्रमाणे गुलबर्ग्यात 6, बेंगळूर शहर जिल्हय़ात 4, बागलकोट जिल्हय़ात 3 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. तयामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या 635 वर पोहोचली आहे.
राज्यात मागील तीन दिवसांत कोरोना रुग्णांची मोठय़ा प्रमाणात भर पडली आहे. त्यामध्ये दावणगेरे आणि गुलबर्गा जिल्हय़ातील रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. दावणगेरेत शुक्रवारी 94, शनिवारी 72 आणि रविवारी 164 असे एकूण 330 जणांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोग शाळेकडे पाठवून देण्यात आले होते. त्यापैकी 37 जणांच्या स्वॅब तपासणीचा अहवाल आला असून 21 जणांचे अहवाल कोरोना पॉजिटिव्ह आले आहेत. दावणगेरे जिल्हा प्रशासनाला आणखी 293 अहवालांची प्रतीक्षा आहे. जिल्हय़ात आतापर्यंत 31 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून केवळ दोघे जण संसर्गमुक्त झाले आहेत.
गुलबर्ग्यातही रविवारी 6 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. रुग्ण क्रमांक 532 च्या संपर्कात असलेल्या 13 वर्षीय बालिका आणि 54 वर्षीय तिच्या पित्याला कोरोनाची लागण झाली. तसेच 41 वर्षीय व्यक्तिला श्वसनाचा त्रास असल्याने जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्याचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. शिवाय 35 वर्षीय महिला आणि 78 वर्षीय वृद्ध अस्थमा आजाराने त्रस्त असून त्यांना कोणामुळे कोरोनाचा संसर्ग झाला आहे, याचा आरोग्य खाते शोध घेत आहे. येथे 22 वर्षीय युवकही संसर्गबाधित आढळून आला आहे.
बेंगळूर शहर जिल्हय़ातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून रविवारी 4 नव्या रुग्णांची भर पडली आहे. 24 वर्षीय युवकाला रुग्ण क्र. 125 च्या संपर्कात आल्याने कोरोना झाला आहे. त्याचप्रमाणे 350 व्या क्रमांकाच्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने 45 वर्षीय दोन महिला आणि 24 वर्षीय युवतीला बाधा झाली आहे. या जिल्हय़ात आतापर्यंत 149 रुग्ण सापडले असून त्यापैकी 72 जण संसर्गमुक्त झाले आहेत. तर 6 जण मृत्युमुखी पडले आहेत. तर एकाने आत्महत्या केली आहे.
बागलकोट जिल्हय़ात मुधोळ तालुक्यात रुग्ण क्रमांक 380 च्या संपर्कात आलेल्या 68 वर्षीय वृद्ध व 60 वर्षीय महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच बदामी तालुक्यातील 23 वर्षीय युवतीला देखील संसर्ग झाला आहे.
मागील 24 तासांत राज्यात 22 रुग्ण संसर्गमुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 293 जण संसर्गमुक्त झाले आहेत.