ऑनलाईन टीम / फ्लोरिडा :
बिल गेट्स, बराक ओबामा, इलॉन मस्क, कान्ये वेस्ट आणि जो बायडेन यांच्यासारख्या दिग्गजांचे ट्विटर अकाउंट्स हॅक करण्याऱ्या फ्लोरिडातील 17 वर्षीय मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. बिटकॉईन घोटाळ्यास चालना देण्यासाठी त्याने हा घोटाळा केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याने ही अकाउंट्स हॅक करून 1 लाख डॉलर कमावले आहेत.
ग्रॅहम इव्हान क्लार्क असे या आरोपीचे नाव असून, तो फ्लोरिडाच्या टेंपा येथील रहिवाशी आहे. त्याच्यावर संस्थागत फसवणूक आणि हॅकिंगसह अन्य 30 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. अमेरिकेतील फेडरेअल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे (एफबीआय) आणि डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने या प्रकरणात कसून चौकशी सुरु केली होती. अखेर यातील आरोपींना पकडण्यात यश आले आहे.
ग्रॅहम इव्हान क्लार्कला हा ट्विटर हल्ला करण्यासाठी मदत केल्याप्रकरणी न्याय विभागाने ब्रिटेनच्या 19 वर्षीय जॉन शेपार्ड आणि ऑरलँडोचा नीमा फजेलीला अटक केली आहे. दरम्यान, याप्रकरणी वेगवान चौकशी आणि कारवाईबद्दल ट्विटरने अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.