दिघंची / वार्ताहर
सांगलीतील आटापाडी तालुक्यातील दिघंची येथील ढोले मळा परिसरात असलेल्या सिदोबा शेत शिवारात गावठी देशी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर आज गुरुवारी दुपारी छापा टाकण्यात आला. आटपाडीचे नूतन पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात दारू तयार करण्याचे रसायन व तयार गावठी दारू जप्त करण्यात आली. यावेळी मारुती साहेबराव बुधावले यास अटक करण्यात आहे.
गावठी दारू तयार करण्याबरोबरच दारू विक्रीची चर्चा काही दिवसांपासून दिघंची परिसरात दबक्या आवाजात सुरू होत्या. याबाबत पोलीस पाळत ठेवून होते. गुरुवारी पोलीस पथकाला मिळालेल्या माहिती नुसार आटपाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सपोनी चोरुमले, पोना रामचंद्र खाडे, पोना नितीन मोरे, प्रमोद रोडे आदींनी सिदोबा शेत परिसरात सापळा रचून छापा टाकला. या गावठी दारु अड्ड्यावर कारवाई केली.
यावेळी सदर छाप्यात 1000 लिटर हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन, 60 लिटर कच्ची हातभट्टीची दारू, दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे विविध साहित्य जप्त करण्यात आले. तसेच मारुती बुधावले याला अटक करण्यात आली असून याबाबत आटपाडी पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.