वार्ताहर / दिघंची
सध्या कोरोना आजाराच्या संक्रमनामुळे पूर्ण जगात भीतीचे वातावरण आहे.पूर्ण देशात संचारबंदी चा आदेश लागू आहे.संसर्ग होऊ नये म्हणून रोज शासन प्रबोधन करत आहे.नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग चा नियम पाळण्याचे आवाहन केले जातेय परंतु या सर्व गोष्टीला हरताळ फासण्याचा प्रकार दिघंची येथे सोमवारी घडला.सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोरे ग्राहकांनी बँक उघडायच्या आधीच मोठी गर्दी केली.शेवटी सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करण्याची वेळ आली.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दिघंची येथील शाखेमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार चालतात.बऱ्याच शासकीय योजनांचे लाभ या शाखेमधील खात्यांवर वर्ग केले जातात त्यामुळे बँकेत गर्दीचे प्रमाण जास्त असते. सलग तीन दिवस बँकेला सुट्टी असल्याने सोमवारी सकाळी बँक सुरू होण्याच्या आधी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर मोठी गर्दी केली होती.बँक सुरू होण्याच्या आधीच ग्राहकांनी मोठी रांग लावली होती.परंतु सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचे भान एका देखील ग्राहकाला नव्हते.अनेकांनी तर आपल्या तोंडाला मास्क लावण्याची देखील तसदी घेतली नसल्याचे चित्र होते.
सदर जिल्हा बँकेच्या शाखेमध्ये रोज शासनाच्या नियमानुसार सोशल डिस्टन्सिंग पाळून एक एक ग्राहकाला रांगेत उभे करून बँकेचे व्यवहार पाळले जातात.परंतु आज अचानक ग्राहकांनी कोणतीही काळजी न घेता गर्दी केल्याने बँक कर्मचाऱ्यांना अक्षरशः घाम फुटला.सदर ठिकाणी गर्दी झाल्याचे समजताच पोलीस कर्मचारी शिवाजी भोते यांनी तात्काळ धाव घेतली.व सर्व बँक ग्राहकांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करत शिस्त लावली.तसेच लोकांनी कृपया शासनाने दिलेल्या नियमावली पाळा अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल असे आवाहन केले.तसेच बँकेचे शाखाधिकारी दादासाहेब पिंजारी यांनी सांगितले की रोज ग्राहकांना सोशल डिस्टन्सिंग पाळून व योग्य ती काळजी घेऊन बँकेचे व्यवहार केले जातात. शासन स्तरावर वारंवार सोशल डिस्टन्सिंग तसेच कोरोना ला अटकाव करण्याबाबत च्या सूचना वारंवार देण्यात येत आहेत.परंतु अजून देखील काही ठिकाणी याला हरताळ फसण्यात नागरिक धन्यता मानत असल्याने प्रशासकीय यंत्रणेची डोकेदुखी वाढतच आहे.