वैद्यकीय अधिकाऱ्यांशी केली चर्चा, भीती न बाळगता काळजी घेण्याचे आवाहन
दिघंची/ प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खानापुर मतदारसंघाचे विद्यमान आमदार अनिल भाऊ बाबर यांनी सोमवारी दिघंची येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदार अनिल भाऊ बाबर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत तेथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्ष राहण्याबाबत सूचना केल्या.
दिघंची प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनायक पवार यांच्यासह कर्मचाऱ्यांशी आमदार अनिलभाऊ बाबर यांनी संवाद साधला. दिघंचीमध्ये दोन कोरोनाचे रुग्ण सापडले असून त्या भागातील कंटेनमेंट झोनमधील नागरिकांची तपासणी करणे तसेच मधुमेह, रक्तदाब आदी आजार असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्याबाबत आमदार अनिल भाऊ बाबर यांनी सूचना केल्या.
संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजवला असून नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणे गरजेचे असून वेळोवेळी आपले हात साबणाने अथवा सॅनिटायझर ने स्वच्छ केले पाहिजेत. विनाकारण घराबाहेर न पडता लोकांनी घरीच थांबणे गरजेचे आहे. आजाराला न घाबरता शासकीय नियम पाळून सर्वांनी मिळून आपल्या गावाची व परिसराची काळजी घेण्याचे आवाहन आमदार अनिल भाऊबाबर यांनी यावेळी केले. यावेळी सरपंच अमोल मोरे, विकास मोरे, बाळासाहेब होनराव आदी उपस्थित होते.