जागतिक कीर्तीचे वैद्य उपलब्ध व्हिक्टर अल्बुकर्क यांची माहिती
प्रतिनिधी / पणजी
आजारपणातील उपचारांबाबत गोरगरीबांना दिलासा देणाऱया ’दिनदयाळ स्वास्थ्य सेवा’ या सरकारी योजनेच्या लाभार्थींना आता मडगाव येथील प्रसिद्ध सुपरस्पेशालिटी इस्पितळ असलेल्या व्हिक्टर इस्पितळातही उपचार घेता येणार आहेत. त्यासाठी रुग्णाला कोणताही अतिरिक्त खर्च न करता पूर्णपणे मोफत अशीच ही सेवा मिळणार आहे, अशी घोषणा अल्कॉन व्हिक्टर ग्रुपचे सीएमडी व्हिक्टर अल्बुकर्क यांनी केली.
त्यानिमित्त पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. योजनेचे कार्डधारक असलेल्या कोणत्याही नागरिकाने इस्पितळात दाखल व्हावे आणि बरे होऊन घरी जावे, खर्चाची चिंता करू नये, अशी ही उपचारपद्धती असेल, असे त्यांनी पुढे सांगितले.
पत्रकार परिषदेत त्यांच्यासोबत ओपन हार्ट शस्त्रक्रियेतील माहीर व गत 25 वर्षांत 25 हजारांपेक्षा जास्त शस्रक्रिया करणारे देशातील नामवंत हृदयरोगतज्ञ डॉ. एम. डी. दीक्षित, वरिष्ठ हृदयरोग शल्यविशारद डॉ. शिवराम बी. के., इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजीमधील अनेक विक्रम नावावर असलेले डॉ. विनायगा पंडियन, अतिदक्षता विभागाची जबाबदारी सांभाळणारे सुमारे 30 वर्षांचे अनुभवी डॉ. रॉबर्ट डिकॉस्टा आणि विभागप्रमुख डॉ. राजेश जवहेरनी आदी मान्यवर उपस्थित होते.
गत सुमारे 17 वर्षांपासून मडगाव येथे कार्यरत असलेले व्हिक्टर इस्पितळ हे रुग्णसेवेतील एक नामांकित असे सुपर स्पेशालिटी इस्पितळ आहे. त्यातील कार्डिओ व्हस्कुलर विभागाचे आधुनिकीकरण करण्यात आले असून विविध औषधोपचार क्षेत्रातील सल्लागार डॉक्टरांची उपलब्धता व 24 तास अखंडित सेवा देत आहे. राज्यात दरमहा सरासरी 5 बालरुग्णांसह त्यांचे कुटुंबीय हृदयसमस्येवर उपचारांसाठी अन्य राज्यात जातात. अशा रुग्णांसाठी लवकरच व्हिक्टर इस्पितळात बालरोग हृदय शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्याचाही विचार आहे, असे डॉ. दीक्षित यांनी सांगितले.
इस्पितळात आता ’मिनिमली इन्वेझिव’ म्हणजेच शरीरास कमीतकमी छेद देऊन करता येणारी बायपास शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. पारंपरिक उपचार पद्धतीत रुग्णाची छाती पूर्ण फाडावी लागत होती. नव्या सुविधेमुळे छातीवर छोटेसे छिद्र पाडून शस्त्रक्रिया करणे शक्य झाले असून तिचे परिणाम व यशाची टक्केवारीही चांगली असल्याचे त्यांनी सांगितले.
या इस्पितळात केवळ डीडीएसएसव्हाय कार्डधारकांवरच उपचार करण्यात येतील असे नव्हे तर ज्यांच्याकडे कार्ड नाहीत, अशा रुग्णांनाही अनुदानीत दरात सेवा देण्यात येईल. त्याशिवाय हृदयशस्त्रक्रिया करण्यात आलेल्या रुग्णांवर उपचारांनंतरच्या देखभालीसाठीही पूर्णवेळ डॉक्टरांचे पथक उपलब्ध करण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले.