केकेआरच्या नाराज चाहत्यांची एकमुखाने मागणी
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सला पराभव स्वीकारावा लागल्यानंतर दिनेश कार्तिकच्या नेतृत्वावर आणखी एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. इंग्लंडला विश्वचषक जिंकून देणारा मॉर्गनला कार्तिकच्या नेतृत्वाखाली खेळावे लागत असल्याबद्दल यापूर्वी अनेकांनी ट्वीटरवर नाराजी व्यक्त केली होती. आता मागील लढतीत मॉर्गनला त्याने पाचव्या स्थानी फलंदाजीला पाठवल्याबद्दल चाहत्यांमधील असंतोष उघड होऊ लागला आहे.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध इयॉन मॉर्गन व राहुल त्रिपाठी यांनी अंतिम टप्प्यात जोरदार फटकेबाजी करत 30 चेंडूत 88 धावांची भागीदारी साकारल्यानंतरही केकेआरला 18 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. मार्गनला उशिराने फलंदाजीला पाठवल्याबद्दल दिनेश कार्तिक टीकेचे लक्ष्य ठरला आहे. त्या लढतीत दिनेशने स्वतः बढतीवर फलंदाजीला येण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजी स्पेशालिस्ट म्हणून संघात स्थान मिळालेल्या राहुल त्रिपाठीला 8 व्या स्थानी फलंदाजीला उतरवण्याचा निर्णयही तितकाच वादग्रस्त ठरला.
केकेआरची मागील हंगामात पिछेहाट झाली होती. ती मालिका यंदा मोडीत काढायची असेल तर नेतृत्वात बदल करत मॉर्गनकडे सूत्रे सोपवावीत, अशी केकेआरच्या चाहत्यांची मागणी आहे. फलंदाजीत इयॉन मॉर्गन व गोलंदाजीत पॅट कमिन्ससारखे अव्वल खेळाडू असल्याने संघाला बऱयाच अपेक्षा करता येतील, असे प्राथमिक चित्र आहे. सध्या आतापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यात केकेआरने 2 विजय व 2 पराभव अशी समसमान कामगिरी नोंदवली आहे.