प्रतिनिधी /पणजी
अखिल भारतीय काँग्रेसचे गोवा प्रमुख दिनेश गुंडूराव हे आज दि. 23 रोजी गोव्यात दाखल होत आहेत. आपल्या चार दिवसांच्या मुक्कामात ते राज्यातील विविध गटाध्यक्षांची भेट घेणार आहेत. त्याच बरोबर पक्षाचे नेते, पदाधिकारी यांच्याशीही बैठका घेऊन चर्चा करणार आहेत.
दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री तथा गोव्याचे निरीक्षक म्हणून नियुक्ती झालेले काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम येत्या 25 ऑगस्ट रोजी गोवा भेटीवर येत आहेत. आपल्या दोन दिवसांच्या मुक्कामात ते पक्षाचे विविध नेते, जिल्हा, गट अध्यक्ष, यांची भेट घेऊन येत्या निवडणुकीसंदर्भात चर्चा व धोरण ठरविणार आहेत.
काणकोणात आज कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार
काणकोण मतदारसंघातील काँग्रेसचे हात बळकट करतानाच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आज 23 रोजी संध्याकाळी 3.30 वा. काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव काणकोणला भेट देणार असून श्रीस्थळच्या पंचायत सभागृहात काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत उपस्थित राहणार आहेत, असे काणकोण गट काँग्रेसचे अध्यक्ष प्रलय भगत यांनी कळविले आहे.