वाजिद हुसैन नावाचा आरोपी अटकेत
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
अर्जेंटीनाचे दिवंगत दिग्गज फुटबॉलपटू दियागो माराडोना यांचे घडय़ाळ आसाममध्ये हस्तगत करण्यात आले आहे. याची माहिती मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी सोशल मीडियावर दिली आहे. माराडोना यांचा नोव्हेंबर 2020 मध्ये मृत्यू झाला होता. आसाम पोलिसांनी दुबई पोलिसांसोबत मिळून चराईदेव जिल्हय़ातून माराडोना यांचे चोरीला गेलेले घडय़ाळ मिळविले आहे. याप्रकरणी वाजिद हुसैनला अटक करण्यात आली आहे.
माराडोना यांचे हुब्लोट कंपनीचे घडय़ाळ हस्तगत करण्यात आले आहे. हे घडय़ाळ दुबईतून चोरीला गेले होते. याची किंमत सुमारे 19 लाख रुपये इतकी आहे. दुबई पोलिसांनी याप्रकरणी भारतातील कायदा-सुव्यवस्था अंमलबजावणी यंत्रणांशी समन्वय साधला होता अशी माहिती आसामच्या पोलीस महासंचालकांनी दिली आहे.
अटकेतील आरोपी आसामचा शिवसागर जिल्हय़ाचा रहिवासी आहे. आरोपी दुबईतील कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. ही कंपनी माराडोनाशी संबंधित सामग्रीचा संग्रह करत होती. आरोपी ऑगस्ट महिन्यात भारतात परतला होता. गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी एका मोहिमेदरम्यान वाजिदला मोरनहाट भागातून ताब्यात घेतले आहे.
अर्जेंटीनाच्या वतीने खेळताना माराडोना यांनी 91 सामने खेळत 34 गोल केले होते. 1986 च्या फिफा वर्ल्डकपमध्ये ते अर्जेंटीनाच्या संघाचे कर्णधार होते. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या माराडोना यांनी गोल्डन बॉल पुरस्कार पटकाविला होता. माराडोना यांना फीफा प्लेयर ऑफ द सेंच्युरीनेही गौरविण्यात आले होते.