वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लंकेचा माजी क्रिकेटपटू आणि फलंदाज तिलकरत्ने दिलशानने आपल्या पसंतीचा सर्वोत्तम वनडे संघ निवडला असून त्यामध्ये भारताचा एकमेव क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा समावेश केला आहे.
दिलशानने निवडलेल्या सर्वोत्तम वनडे संघामध्ये लंकेचा माजी कर्णधार आणि स्फोटक फलंदाज सनथ जयसुर्या आणि सचिन तेंडुलकर यांना सलामीच्या जोडीसाठी पसंती दिली आहे. वनडे क्रिकेटमध्ये 1996 साली लंकेच्या सलामीच्या फलंदाजांनी आक्रमक फटकेबाजीवर भर देत पहिल्या 15 षटकांत अधिक धावा जमविण्याचे तंत्र अवलंबले होते. सलामीच्या जयसुर्याने आक्रमक फलंदाजीवर आपल्या संघाला बऱयाच सामन्यांमध्ये विजय मिळवून देण्यात हातभार लावला आहे. मात्र जयसुर्याच्या तुलनेत सचिन तेंडुलकर हा अधिक स्टायलिश फलंदाज म्हणून ओळखला जातो. डावाला सुरूवात करण्यापूर्वी कोणत्या पद्धतीने फलंदाजी करायची याचा अचूक अंदाज सचिनकडे पाहावयास मिळत असे. सचिन कोणत्याहीक्षणी संघाच्या गरजेनुसार आक्रमक फलंदाजी करत असे, असेही दिलशानने म्हटले आहे.
दिलशानच्या या सर्वोत्तम वनडे संघात विंडीजचा माजी कर्णधार ब्रायन लारा याला तिसरे स्थान दिले आहे. लाराकडे नैसर्गिक फलंदाजीचा गुण असल्याने तो नेहमीच आपल्या संघाची बाजू भक्कम करताना योग्य अशी फलंदाजी करत असे. लंकेचा महेला जयवर्धने याला चौथ्या क्रमांकासाठी पसंती दिली असून ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिंकी पाँटींग हा पाचव्या स्थानी, दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू जॅक्वीस कॅलीस सहाव्या स्थानी तसेच दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हीलीयर्स याला सातव्या क्रमांकासाठी फलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणून पसंती दिली. पाकचा माजी कर्णधार वासीम अक्रम, विंडीजचा माजी कर्णधार कोर्टनी वॉल्श, मुथय्या मुरलीधरन आणि शेन वॉर्न यांना गोलंदाज म्हणून दिलशानने आपल्या सर्वोत्तम संघात निवड केली आहे.