ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडातून एक दिलासादायक बाब समोर आली आहे. दोन महिन्यांनंतर एका दिवसात सर्वात कमी म्हणजेच 241 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 376 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 58,601 वर पोहोचली आहे.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील 24 तासात 14,035 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यातील 13,794 नमुने निगेटिव्ह आले आहेत. रुग्ण वाढण्याचे प्रमाण कमी झाले असल्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे.
याआधी 19 ऑगस्ट रोजी 264 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर सातत्याने हे प्रमाण वाढतच होते. आता दोन महिन्यांनंतर मात्र, मंगळवारी केवळ 241 रुग्णांनाच कोरोनाची बाधा झाली. तर कालच्या दिवशी 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सध्या उत्तराखंडात 5,364 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 51, 862 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर एकूण 946 जणांनी आपला जीव गमावला आहे.