ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा भारतातील आठ राज्यात शिरकाव झाला आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या 37 वर पोहचली असतानाच महाराष्ट्रातून दिलासादायक बातमी समोर आली आहे. ओमायक्रॉनच्या महाराष्ट्रातील एकूण 18 रुग्णांपैकी 9 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आरोग्य विभागाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
रविवारी नागपूरमधील एका 40 वषीय व्यक्तीमध्ये ओमायक्रॉनची पुष्टी झाली आहे. तो व्यक्ती आफ्रिकेतून आला होता. त्याला ओमायक्रॉनची लक्षणे सौम्य असून सध्या एम्समध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 30 जणांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत मुंबईत 5, पिंपरी-चिंचवडमध्ये 10, पुणे महापालिका हद्दीत 1, कल्याण-डोंबिवलीत 1 असे एकूण 18 ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले होते. यापैकी 9 रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून सोडले आहे.
दरम्यान ,सध्या महाराष्ट्रात 9, राजस्थानमध्ये 9, कर्नाटकात 3, गुजरातमध्ये 3, दिल्लीत 2, आंध्रप्रदेश आणि चंदीगढमध्ये ओमायक्रॉनचा प्रत्येकी एक रुग्ण उपचार घेत आहे.