मुंबई \ ऑनलाईन टीम
बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे आज सकाळी दिर्घ आजाराने निधन झाले. ते ९८ वर्षांचे वर्षांचे होते. दिलीप कुमार यांच्या जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. दिलीप कुमार यांनी आज सकाळी मुंबईच्या हिंदूजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. दिपील कुमार यांचे पार्थिव रुग्णालयातून त्यांच्या राहत्या घरी नेण्यात आले असून दिलीप कुमार यांच्यावर आज सायंकाळी ५ वाजता शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याच्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
दिलीप कुमार यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे जून महिन्यात रुग्णालयात दाखल करावे लागले होते. बायलॅटरल प्लुरल इफ्युजनमुळे त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते. त्यावेळी सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांचा रुग्णालयातील फोटोदेखील शेअर करत त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली होती. उपचारानंतर पाच दिवसांनी दिलीप कुमार यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करावे लागले होते. आज सकाळी ७.३० वाजता दिलीप कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला.
भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारा, रूपेरी नभांगणातला लखलखता तारा निखळला. अजरामर भूमिका साकारणरे दिलीप कुमार यांचे चित्रपटप्रेमी, चाहत्यांच्या ह्रदयातील स्थानही अजरामर राहिल. ज्येष्ठ अभिनेते पद्मभूषण दिलीप कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली,असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी देखील दिलीप कुमार यांच्या निधनाची वार्ता कळताच त्यांच्या पत्नी सायरा बानू यांना फोन करुन धीर दिला.
सामान्य माणसाच्या आयुष्यातील दुःख दिलीप कुमार यांनी त्यांच्या अभिनयातून उतरवले आणि पुढची अनेक वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य केले.