भोपाळमधील कारवाईत 4 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त
@ भोपाळ / वृत्तसंस्था
दिल्लीतील सीबीआयच्या पथकाने भोपाळमधील दिलीप बिल्डकॉनच्या कार्यालयावर आणि घरावर छापा टाकला. कंपनीचे मालक दिलीप सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी सहा ते सात अधिकाऱयांचे पथक शुक्रवारी दिवसभर तपास करत होते. या कारवाईदरम्यान घर आणि कार्यालयात कर्मचाऱयांना प्रवेश देण्यात आला नव्हता. या छाप्यात चार कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या कारवाईबाबत स्थानिक पोलीस आणि राज्यातील सीबीआय अधिकारीही अनभिज्ञ होते. हे संपूर्ण प्रकरण लाचखोरीशी संबंधित असल्याचा दावा सीबीआयच्या सूत्रांनी केला आहे. दिलीप बिल्डकॉन कंपनीचे मालक दिलीप सूर्यवंशी यांची गणना देशातील बडय़ा उद्योगपतींमध्ये केली जाते. अनेक राजकारण्यांशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात ते मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे निकटवर्तीय मानले जातात.
दिलीप बिल्डकॉन कंपनीचा महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांमध्ये व्यवसाय आहे. हीच कंपनी भोपाळ मेट्रो रेल्वेचे कामही करत आहे. दिलीप सूर्यवंशी यांनी 1988 मध्ये दिलीप बिल्डकॉन या नावाने कंपनी स्थापन केली होती. सुरुवातीला त्यांनी छोटे निवासी प्रकल्प, सरकारी इमारती आणि पेट्रोलपंप उभारले होते. त्यानंतर 1995 मध्ये 21 वषीय अभियंता देवेंद्र जैन यांच्या साथीने ते रस्तेनिर्मिती आणि अन्य मोठय़ा प्रकल्पांची कंत्राटे घेत आहेत. भोपाळमधील हॉटेल ताज लेक प्रंट हे दिलीप बिल्डकॉन कंपनीनेच बांधले आहे. ऑक्टोबरमध्ये मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले होते.