शहरातील अनेक भागात साचले पाणी : वाहतुकीची कोंडी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या दोन दिवसांपासून राजधानी दिल्लीमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे दिल्लीकरांच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील बऱयाच भागात गुरुवारी पाणी साचल्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागलेल्या दिसून येत होत्या. रस्ते वाहतूक व्यवस्था कोलमडण्याबरोबरच अतिपावसामुळे मेट्रो लाईनही बराच वेळ ठप्प होती.
शहरात बुधवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे उच्चभ्रू समजल्या जाणाऱया लोधी गार्डन भागातही पाणी साचले होते. या भागात बहुतांश खासदारांचे वास्तव्य आहे. अर्थातच खासदार निवासस्थानेही पावसाच्या विळख्यात सापडलेली दिसून येत होती. तसेच हजरत निजामुद्दीन भागात रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर जनकपुरी, गुडगाव, राजोरी गार्डन, धोला कुंवासह अनेक भागात रस्त्यावर पाणी साचल्याचे दिसून येत होते. एकंदर संततधार पावसामुळे दिल्लीकरांचे सामान्य जीवन विस्कळीत झाले आहे.