सामनावीर अमित मिश्राचे 24 धावात 4 बळी, दिल्लीतर्फे फलंदाजीत शिखर धवन
चेन्नई / वृत्तसंस्था
आणखी एका लो स्कोअरिंग आयपीएल साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने विद्यमान विजेत्या मुंबई इंडियन्सला 6 गडी राखून पराभवाचा जोरदार शॉक दिला व 2 गुणांची कमाई केली. प्रारंभी, अमित मिश्राने 24 धावात 4 बळी घेतल्यानंतर त्यांनी मुंबईला 9 बाद 137 धावांवर रोखले व प्रत्युत्तरात 19.1 षटकात 4 गडय़ांच्या बदल्यातच विजयाचे लक्ष्य गाठले. अमित मिश्रा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
विजयासाठी 138 धावांचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ (7) स्वस्तात बाद झाला. मात्र, शिखर धवन (42 चेंडूत 45) व स्टीव्ह स्मिथ (29 चेंडूत 33) यांनी दुसऱया गडय़ासाठी 53 धावांची भागीदारी साकारत संघाला सुस्थितीत आणले. स्मिथ बाद झाल्यानंतर धवनने नवोदित ललित यादवच्या (25 चेंडूत नाबाद 22) साथीने तिसऱया गडय़ासाठी आणखी 36 धावा जोडल्या. धवन तिसऱया गडय़ाच्या रुपाने बाद झाला, त्यावेळी दिल्लीने 14.5 षटकात 100 धावांपर्यंत मजल मारली होती. कर्णधार रिषभ पंत (7) स्वस्तात बाद झाला. मात्र, शिमरॉन हेतमेयरने 9 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 14 धावा फटकावत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब करुन दिले.
शेवटच्या षटकात विजयासाठी 5 धावांची आवश्यकता असताना पोलार्ड गोलंदाजीला आला. मात्र, शिमरॉन हेतमेयरने षटकातील पहिलाच चेंडू स्वीपर फटक्यावर चौकारासाठी पिटाळला तर दुसऱया नोबॉल दिल्या गेलेल्या बीमरवर दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स ः पृथ्वी शॉ झे. व गो. जयंत यादव 7 (5 चेंडूत 1 चौकार), शिखर धवन झे. कृणाल, गो. चहर 45 (42 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), स्टीव्ह स्मिथ पायचीत गो. पोलार्ड 33 (29 चेंडूत 4 चौकार), ललित यादव नाबाद 22 (25 चेंडूत 1 चौकार), रिषभ पंत झे. कृणाल, गो. बुमराह 7 (8 चेंडूत 1 चौकार), शिमरॉन हेतमेयर नाबाद 14 (9 चेंडूत 2 चौकार). अवांतर 10. एकूण 19.1 षटकात 4 बाद 138.
गडी बाद होण्याचा क्रम
1-11 (शॉ, 1.3), 2-64 (स्टीव्ह स्मिथ, 9.2), 3-100 (शिखर धवन, 14.5), 4-115 (रिषभ पंत, 16.5).
गोलंदाजी
ट्रेंट बोल्ट 4-0-23-0, जयंत यादव 4-0-25-1, जसप्रित बुमराह 4-0-32-1, कृणाल पंडय़ा 2-0-17-0, राहुल चहर 4-0-29-1, केरॉन पोलार्ड 1.1-0-9-1.