आज स्वीकारणार पदभार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
वरिष्ठ आयपीएस अधिकारी बालाजी श्रीवास्तव दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त होणार आहेत. 1988 च्या तुकडीचे ते आयपीएस अधिकारी आहेत. यासंबंधी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून आदेश काढण्यात आला आहे. एस. एन. श्रीवास्तव यांची ते जागा घेणार आहेत. बालाजी श्रीवास्तव बुधवारी पदभार सांभाळणार आहेत. नियमित पदाधिकाऱयाची नियुक्ती किंवा पुढील आदेशापर्यंत ते पोलीस आयुक्त म्हणून काम करणार असल्याचे गृह मंत्रालयाच्या आदेशात म्हटले गेले आहे.
विद्यमान पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांची नियुक्ती दिल्ली दंगलीदरम्यान फेब्रुवारी 2020 मध्ये करण्यात आली होती. ते बुधवारी निवृत्त होत आहेत. एस. एन. श्रीवास्तव यांनी दंगलीवर नियंत्रण मिळविले हेते आणि राजधानीला शांततापूर्ण वातावरण प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. एस. एन. श्रीवास्तव निवृत्त होणार असल्याने अनेक आयपीएस अधिकारी पोलीस आयुक्त पदाच्या शर्यतीत होते, पण अखेर बालाजी श्रीवास्तव यांनी बाजी मारली आहे.
बालाजी श्रीवास्तव यापूर्वी पुड्डुचेरीचे पोलीस महासंचालक राहिले आहेत. सद्यकाळात ते विशेष पोलीस आयुक्त (दक्षता) म्हणून कार्यरत होते. बालाजी श्रीवास्तव हे जानेवारी महिन्यात पुड्डुचेरीमधून बदली होत दिल्लीत रुजू झाले होते. काही वर्षांपूर्वीच ते रिसर्च ऍनालिसिस विंगमध्येही कार्यरत होते. मिझोरमचे पोलीस महासंचालक आणि दिल्लीत आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पेले आहे.