ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली पोलिसांनी घरातच नजरकैदेत ठेवले आहे. केजरीवाल यांनी सोमवारी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. आम आदमी पक्षाने ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे.
कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर मागील 12 दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, केजरीवाल सोमवारी सकाळी शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी सिंघू सीमेवर पोहोचले होते. त्यावेळी शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या व्यवस्थेचाही आढावा घेतला.
केजरीवाल म्हणाले, आम्ही सुरुवातीपासूनच शेतकरी आंदोलनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या रास्त आहेत. त्याच्याशी मी सहमत आहे. सरकारने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. मी मुख्यमंत्री म्हणून येथे आलो नाही, सेवक म्हणून आलो आहे. आंदोलनस्थळी पाण्याची समस्या आहे, ती लवकरच दूर होईल.