कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी दिल्ली सरकारने ऑपरेशन शिल्ड सुरू केले आहे. दिल्ली सरकारने दिलशाद गार्डनमध्ये ही मोहीम यशस्वीपणे राबविली आहे. दिलशाद गार्डनमध्ये 8 रुग्ण सापडल्यावर सरकारने तेथे ऑपरेशन शिल्ड राबविली. 15 दिवसांच्या अथक मेहनतीनंतर अता या क्षेत्राला कोरोनामुक्त करण्यात आले आहे. मागील 10 दिवसांपासून तेथे नवा रुग्ण सापडला नसल्याचे सरकारने म्हटले आहे.
सीसीटीव्हींच्या मदतीने शोधले सहवासित
दिलशाद गार्डनमधील एक महिला तसेच तिचा मुलगा सौदी अरेबियातून परतल्यावर कोरोनाग्रस्त आढळून आले होते. महिलेवर उपचार करणाऱया मोहल्ला क्लीनिकच्या डॉक्टरसह 7 जणांना याची लागण झाली होती. या पार्श्वभूमीवर सरकारने दिलशाद गार्डन आणि पुरानी सीमापुरी भाग पूर्णपणे कंटेन्मेंट झोन घोषित केला. महिलेच्या 81 कॉन्टॅक्ट्सची ओळख पटवून त्यांच्यावर उपचार करत त्यांना क्वारेंटाईन करण्यात आले.
23 वैद्यकीय पथकांकडून स्क्रीनिंग
दिलशाद गार्डन आणि पुरानी सीमापुरीमध्ये 123 वैद्यकीय पथकांची स्थापना करण्यात आली. या पथकांनी 4032 घरांमध्ये राहणाऱया 15 हजारांपेक्षा अधिक लोकांचे स्क्रीनिंग केले. कोरोनाची लक्षणे आढळून येणाऱया व्यक्तींना क्वारेंटाईन करण्यात आले. तेथे आता नवा रुग्ण सापडला नसला तरीही शासकीय अधिकीर सातत्याने 15 हजार लोकांना फोन करून प्रकृतीची माहिती घेत आहेत.
संसर्गाचा प्रवास
पीडित महिला मुलासह 10 मार्च रोजी सौदी अरेबियातून परतली होती. 12 रोजी महिलेला सर्दी-खोकल्याचा त्रास सुरू झाला. सामान्य आजार असल्याचे मानून महिलेने पुरानी सीमापुरीच्या मोहल्ला क्लीनिकमध्ये जात औषध घेतले. पण तरीही प्रकृती न सुधारल्याने 15 मार्च रोजी रुग्णालयात पोहोचलेल्या महिलेची चाचणी करण्यात आली होती.
व्यापक मोहीम
महिलेच्या संपर्कात 81 लोक आले होते आणि यात मोहल्ला क्लीनिकचा डॉक्टरही सामील होता. महिलेने चौकशीत सहकार्य केले असले तरीही तिचा मुलगा कुठे-कुठे गेला तसेच कुणाला भेटला हे सांगू शकला नाही. या कारणामुळे दिल्ली सरकारने जागोजागी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱयांचे चित्रण पडताळण्यात आले. सीसीटीव्ही चित्रणात महिला आणि तिचा मुलगा ज्या लोकांना भेटल्याचे दिसून आले त्या सर्वांची ओळख पटवून त्यांना क्वारेंटाईन करण्यात आले आहे.
पूर्ण भागालाच होता धोका
दिलशाद गार्डनवर घोंगावणारा धोका पाहता दिल्ली सरकारने 123 वैद्यकीय पथकांची स्थापना केली, पोलिसांचेही सहकार्य मिळाले तसेच दिलशाद गार्डन आणि पुरानी सीमापुरी भागाला पूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आले. दोन्ही भागातील लोकांच्या ये-जा करण्यावर बंदी घालण्यात आली. महिलेच्या संपर्कात येणाऱया मोहल्ला क्लीनिकच्या डॉक्टरला कोरोनाची बाधा झाली होती. 123 वैद्यकीय पथकांना प्रत्येकी 50 घरांचे स्क्रीनिंग करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. 15 हजारांपेक्षा अधिक लोकांचे स्क्रीनिंग करत आरोग्य तपासण्यात आले. प्रकृती बिघडलेल्या रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय पथके आताही प्रतिदिन फोन करून लोकांची माहिती घेत आहेत.
पोलिसांवर दगडफेक करणाऱयाला संसर्ग
मध्यप्रदेशात कोरोनाच्या बळींची संख्या वेगाने वाढत आहे. शनिवारी इंदोर शहरात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर शुक्रवारी एका डॉक्टरसह 4 जणांना जीव गमवावा लागला होता. शहरात कोरोनामुळे आतापर्यंत 30 जणांचा बळी गेला आहे. तर इंदोरच्या चंदनगरमध्ये पोलिसांवर दगडफेक तसेच त्यांच्याशी गैरवर्तन करणाऱया 4 आरोपींपैकी एक जण कोरोनाबाधित आढळून आला आहे. या आरोपीला जबलपूरमध्ये क्वारेंटाईन केले जाणार आहे. चार जणांना जबलपूर येथे आणण्यात आले असता यातील एकाची प्रकृती बिघडलेली होती. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची चाचणी करण्यात आली असता एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. या आरोपींना इंदोरहून जबलपूर येथे आणणाऱया पोलिसांनाही क्वारेंटाईन केले जाणार आहे.
इंदोरच्या चंदनगरमध्ये या चारही जणांनी पोलिसांवर दगडफेक केली होती. या सर्वांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. तर भोपाळ मध्यवर्ती तुरुंगात नवे कैदी आणले जाणार नाहीत.