शिक्षण संचालकांकडे ‘आप’ची मागणी
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळा दिल्लीतील शाळांच्या धर्तीवर अद्यावत करा, अशी मागणी आम आदमी पार्टीने पुणे विभागाच्या शिक्षण संचालकांकडे केली आहे. शिक्षण संचालक महेश पालकर, दिनकर टेमकर हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई आणि कार्यकर्त्यांनी पालकर, टेमकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. दिल्लीतील शासकीय शाळांचे ज्या पद्धतीने केजरीवाल सरकारने अद्यावतीकरण केले आहे. त्याच धर्तीवर कोल्हापूर महापालिकेच्या शाळा बनवाव्यात.
कोरोनाच्या काळातील फी सवलतीची अंमलबजावणी करण्यासाठी टास्कफोर्सची नियुक्ती तातडीने करण्यात यावी, कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीकडे कायम स्वरूपी शिक्षणाधिकारी नियुक्त करावा, अशा मागण्या ‘आप’च्या वतीने निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी आमदार प्रकाश अबीटकर, शिक्षक आमदार प्रा. जयंत असगावकर,‘आप’चे दिलीप पाटील, अभिजित कांबळे आदी उपस्थित होते.