नर्सेसना मल्याळी भाषेत बोलण्यास मनाई – विरोधानंतर आदेश मागे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील गोविंद वल्लभ पंत इन्स्टीटय़ूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट एज्युकेशन अँड रिसर्चने नर्सिंग स्टाफच्या मल्याळी भाषेच्या वापरावर बंदी घातल्याने वाद उभा राहिला होता. पण या निर्णयाला विरोध सुरू होताच 24 तासांत संबंधित पत्रक मागे घेण्यात आले आहे. कल्पना न देताच हे पत्रक काढण्यात आले होते असे स्पष्टीकरण रुग्णालय प्रशासनाने आता दिले आहे.
रुग्णालयाकडून शनिवारी पत्रक काढण्यात आले होते. यात नर्सिंग स्टाफ केवळ हिंदी किंवा इंग्रजीतच बोलू शकतो, याव्यतिरिक्त अन्य कुठल्या भाषेचा वापर केल्यास त्याच्या विरोधात कारवाई केली जाऊ शकते असे यात म्हटले गेले होते.
नर्सिंग स्टाफ स्वतःच्या स्थानिक भाषेत बोलत असल्याने रुग्णांना त्यांचे म्हणणे समजून घेण्यास त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी रुग्णालय प्रशासनाला मिळाल्या होत्या. याचमुळे हे पत्रक काढण्यात आले होते. सेवेदरम्यान मल्याळी भाषेचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत. बहुतांश रुग्ण ही भाषा जाणत नाहीत, याचमुळे तेथे असुविधेची स्थिती निर्माण होते. याचमुळे संभाषणासाठी हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर करावा, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल असा निर्देश सर्व नर्सिंग स्टाफला देण्यात आला होता.
राहुल गांधी, थरूर यांचा आक्षेप
याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शशी थरूर यासारख्या नेत्यांनी आक्षेप नोंदविला होता. भारतासारख्या लोकशाहीवादी देशात एक शासकीय संस्था स्वतःच्या नर्सिंग स्टाफला मातृभाषेत न बोलण्यास कशी काय सांगू शकते? ही बाब स्वीकारार्ह नसल्याचे दोन्ही नेत्यांनी म्हटले आहे.