ऑनलाईन टीम/तरुण भारत
ओमिक्रॉन व्हेरीअंटच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. देशात सर्वाधिक रुग्ण दिल्ली आणि महाराष्ट्रात आहेत. त्यातच आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वत: ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असून, सौम्य लक्षणं आहेत. स्वत:ला घरातच विलगीकरणात ठेवलं आहे. गेल्या काही दिवसांत जे माझ्या संपर्कात आले, त्यांनीही कृपया स्वतःला विलगीकरणात ठेवा आणि स्वतःची चाचणी करून घ्या असं आवाहन त्यांनी केलं.
शनिवार, रविवार पूर्णपणे बंद
दरम्यान, वाढती कोरोना रुग्ण संख्या आणि ओमायक्रॉनचा धोका या पार्श्वभुमीवर दिल्लीत वीकेंड कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता राजधानी दिल्ली शनिवारी आणि रविवारी आठवड्यातून दोन दिवस पुर्णपणे बंद राहणार आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, आपत्ती व्यवस्थापनाची बैठक झाल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुढे सिसोदिया म्हणाले की, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरुच काम करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तर खाजगी कार्यालय क्षमतेच्या 50% सुरु राहतील. दिल्लीत सोमवारी 4099 कोरोना रुग्ण आढळले होते. दिल्लीत रुग्ण सक्रिय होण्याचा प्रमाण हा 6.46% इतका आहे.