प्रतिनिधी / मडगांव
फातोर्डा येथील एका नागरिकाची ऑन लाईन फसवणूक करणाऱया दिलीतील एका भामटय़ाला फातोर्डा पोलिसांनी दिल्लीला जाऊन अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार फातोर्डा येथील एका नागरिकाने आपल्याला ऑन लाइनमार्फत फसवले गेले असल्याची तकार केली होती. या नागरिकाच्या क्रेडीट कार्डचा ‘ओटीपी’ आरोपीने मागितला आणि हे करत असताना या आरोपीने आपण बँक कर्मचारी असल्याचे सांगितले. बँक कर्मचारी सांगितल्यावर साहजिकच या नागरिकाने त्याच्यावर विश्वास ठेवला व या नागरिकाने त्यांना ‘ओटीपी’ क्रमांक दिला आणि काही मिनिटातच त्यांच्या बँक खात्यातून 19,000 रुपये गायब झाले. आपल्याला फसविण्यात आलेले असल्याची जाणीव होताच या नागरिकाने फातोर्डा पोलीस स्थानकात फिर्याद केली.
पोलीस खात्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग तसेच उपअधीक्षक साहील नारंगल व पोलीस निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली एक खास पोलीस पथक तयार करण्यात आले. या पथकाला योग्य त्या सुचना देऊन दिल्लीला पाठविण्यात आले.
या पथकाने तपास केला आणि संशयित आरोपी एका जागी असल्याची माहिती मिळाली. एका जागी धाड घालून आरोपी कुश गुप्ता (30) याला अटक केली आणि त्याला गोव्यात आणले. फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.