वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोविड बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता सर्व शाळा 5 ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार असल्याचे दिल्ली सरकारने शुक्रवारी जाहीर केले. सर्व सरकारी आणि खासगी शाळा 5 ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांसाठी बंद राहतील. परंतु ऑनलाईन शिकविणे आणि शिकणे नेहमीप्रमाणे चालूच राहील, असे शिक्षण संचालनालयाने आदेशात म्हटले आहे. या आदेशात प्राचार्यांना ऑनलाईन वर्ग किंवा इतर कोणतेही कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यकतेनुसार शिक्षक वा कर्मचाऱयांना बोलावण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. यापूर्वी काही वरिष्ठ इयत्तांतील विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या मार्गदर्शनाची गरज भासल्यास त्यांना शाळांमध्ये येता येईल, असे सरकारने म्हटले होते. परंतु आता शाळा अशा अंशतःही सुरू होणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.