ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीमध्ये तैनात केंद्रीय रिजर्व पोलीस बलाच्या हेडक्वार्टर मधील एका अधिकाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे रविवारी सकाळी तातडीने मुख्यालय सील करण्यात आले आहे, अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यालयातील विशेष महासंचालक श्रेणीतील अधिकाऱ्यास कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे हे मुख्यालय बंद करण्यात आले असून संपूर्ण इमारत सैनीटाईझ केल्याशिवाय ही इमारत सुरू केली जाणार नाही.
सीआरपीएफच्या जिल्हा निरीक्षक अधिकाऱ्यांना वैद्यकीय नियमावलीनुसार प्रोटोकॉल चे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच कोरोनाग्रस्त अधिकाऱ्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेतली जात आहे.
दरम्यान, देशात आत्ता पर्यंत सीआरपीएफचे 137 जवानांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील एका जवानाचा मृत्यू झाला असून एका जवानांची प्रकृती स्थिर असून त्याला घरी सोडण्यात आले आहे. तर बीएसएफ च्या 17 जवानांन कोरोनाची लागण झाली आहे.