वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोना महामारी संकटामुळे गेल्या मार्चपासून सर्व क्रीडा हालचाली थांबविण्यात आल्या होत्या. देशाच्या राजधानीत भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळातर्फे (साई) क्रीडा हालचालींना येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियम आणि नॅशनल स्टेडियममध्ये पुन्हा प्रारंभ करण्यात आला. केंद्र शासनाच्या परवानगीने आऊटडोअर स्पोर्टस्च्या हालचाली टप्याटप्याने सुरू करण्यात आल्या आहेत. दिल्लीतील पाचपैकी दोन स्टेडियम्सवर क्रीडा हालचाली आजपासून सुरू झाल्या आहेत.
येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर आणि मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर मंगळवारपासून नियमावलीचे पालन करत क्रीडा हालचालींना प्रारंभ झाला. सुमारे तासभराच्या कालावधीसाठी कोणत्याही ऍथलीटला ऑनलाईनद्वारे आगाऊ आरक्षण करणे जरूरीचे आहे. दरम्यान येत्या आठवडाभराच्या कालावधीत येथील इंदिरा गांधी स्टेडियम आणि कर्नी सिंग नेमबाजी स्टेडियममध्ये क्रीडा हालचालींना प्रारंभ करण्यात येईल. येथील शामाप्रसाद मुखर्जी जलतरण संकुलातील सर्व जलतरण तलाव अद्याप बंद ठेवण्यात आले आहेत. लॉकडाऊनचा चौथा टप्पा 31 मे रोजी संपणार असून त्यानंतर या जलतरण संकुलात क्रीडा हालचाली पुन्हा सुरू होतील पण प्रशासकीय विभागाकडून सक्तीच्या केलेल्या सर्व नियमांचे पालन करावे लागेल. जवाहरलल नेहरू स्टेडियमवर तिरंदाजी, टेबल टेनिस, बॅडमिंटन आणि लॉन टेनिस या क्रीडाप्रकारातील हालचालींना प्रारंभ झाला आहे. उपलब्ध सुविधांचा विचार करून मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियममध्ये क्रीडा हालचाली पुन्हा सुरू केल्या जातील, असे साईच्या प्रवक्त्याने सांगितले. या स्टेडियममध्ये प्रवेश करताना मास्कचा वापर अनिवार्य असून सॅनिटायजर्स प्रक्रिया जरूरीची असल्याचे सांगण्यात आले. दहा वर्षांवरील वयोगटाच्या कोणत्याही खेळाडूला शासनाच्या नियमावलीनुसार क्रीडा हालचाली सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.