कट उधळला : अनेक महनीय हेते निशाण्यावर : व्हॉट्सऍपद्वारे पाकिस्तानात संपर्क
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने सोमवारी रात्री दोन दहशतवाद्यांना जेरबंद केले आहे. दोन्ही दहशतवाद्यांकडून काही महत्त्वाचे दस्तऐवज आणि स्फोटके हस्तगत करण्यात आली आहेत. दोन्ही दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या संघटनेशी संबंधित आहेत. जम्मू-काश्मीरच्या बारामुला आणि कुपवाडा येथील ते रहिवासी आहेत. व्हॉट्सऍप ग्रुपच्या माध्यमातून ते पाकिस्तानातील म्होरक्यांच्या सपर्कात होते.
दिल्ली पोलिसांच्या गुप्तचर शाखेला काले खां भागात काही संशयित असल्याची माहिती मिळाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर नजर ठेवण्यात आली होती. सोमवारी रात्री ठोस माहितीच्या आधारावर विशेष शाखेच्या पथकाने कारवाई करत दोन्ही दहशतवाद्यांना अटक केली आहे. दोन्ही दहशतवाद्यांकडून दोन सेमी ऑटोमॅटिक पिस्तुल आणि 10 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.
अब्दुल लफीत मीर आणि अशरफ खटाना अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. एक दहशतवादी बारामुल्ला तर दुसरा कुपवाडाचा रहिवासी आहे. राष्ट्रीय राजधानीतील महत्त्वाची ठिकाणे आणि महनीय व्यक्तींना लक्ष्य करण्याचा त्यांचा कट होता. दोघांचीही कसून चौकशी केली जात आहे. ऑगस्ट महिन्यातही दिल्ली पोलिसांनी इस्लामिक स्टेटच्या एका दहशतवाद्याला अटक केली होती. त्याच्याकडून आयईडी उपकरण हस्तगत करण्यात आले होते.
अधिकाऱयांनी दहशतवाद्याच्या मोबाईलची तपासणी केली असता व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये पाकिस्तानी संपर्क क्रमांक आढळले आहेत. दोघेही घातपाती प्रशिक्षणासाठी पाकिस्तानला जाण्याच्या प्रयत्नात होते. त्यांच्या मोबाईलमध्ये जैशचा म्होरक्या मसूद अझहरची चित्रफितही मिळाली आहे. हे दहशतवादी सहारनपूर येथील देवबंद येथेही गेले होते.