ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्ली सरकारने दारूवर लावलेले 70 % ‘कोरोना शुल्क’ मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिल्लीतील दारूच्या किंमती आता कमी होणार आहेत.
लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करत असताना दिल्ली सरकारने दारुविक्रीला काही अटी शर्थिंसह परवानगी दिली होती. मात्र, दारू दुकानांवरील तळीरामांची गर्दी पाहता केजरीवाल सरकारने 5 मे पासून सर्व प्रकारच्या दारूवर 70 टक्के ‘कोरोना शुल्क’ लागू केले होते. त्यामुळे दिल्लीत दारूच्या दरात मोठी वाढ झाली होती. मात्र, आता हे शुल्क रद्द करण्याचा निर्णय केजरीवाल सरकारने घेतला आहे. येत्या 10 जूनपासून दिल्लीत दारू मूळ छापील किंमतीला विकली जाईल.