डिझेल दर ‘नव्वदी’समीप – इंधन दराचा भडका सुरूच
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशाची राजधानी दिल्लीत बुधवारी पेट्रोलच्या दराने शंभरीपार झेप घेतली. बुधवारी पेट्रोलच्या दरात 35 पैसे तर डिझेलच्या दरात 17 पैशांनी वाढ झाली आहे. यापूर्वी सोमवारी पेट्रोल 35 पैशांनी महाग झाले होते. नव्या दरवाढीमुळे दिल्लीत पेट्रोल 100 रुपये 21 पैसे प्रतिलिटर, तर डिझेल 89.53 रुपये प्रतिलिटरने विकले जात आहे. मुंबईत पेट्रोलने 106 रुपयांहून अधिकचा आकडा गाठला आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 106.25 रुपये आहे तर डिझेलची किंमत 97.09 रुपये आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून देशात इंधन दरवाढीचे सत्र सुरुच आहे. देशाच्या राजधानीत 1 मे रोजी पेट्रोलचा दर 90.40 रुपये प्रतिलिटर इतका होता. तर आज पेट्रोल 100 रुपये 21 पैसे प्रति लिटरने विकले जात आहे. गेल्या 68 दिवसांत 9.81 रुपयांनी पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. तर डिझेलची किंमत गेल्या दोन महिन्यात 8.80 रुपये प्रतिलिटरने वाढली आहे.
सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्याचा सपाटाच लावला आहे. देशाच्या वेगवेगळय़ा भागात बुधवारी डिझेलच्या दरात 13 ते 18 पैशांनी वाढ झाली आहे. तर पेट्रोलच्या किंमतीत 33 ते 35 पैशांनी वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यात 37 वेळा दरवाढ झाली असून जवळपास दहा रुपयांनी पेट्रोल महाग झाले आहे. गेल्या काही दिवसात पेट्रोल-डिझेलच्या दरात झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे. मे महिन्यांच्या प्रारंभी पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यापासून पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठा बदल झाला आहे. अनेक राज्यात विधानसभा निवडणुकांच्या प्रक्रियांमुळे मार्च आणि एप्रिल महिन्यात इंधन दरात कोणताच बदल झाला नव्हता.