चकमकीनंतर शस्त्रसाठय़ासह घेतले ताब्यात : दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्ली पोलिसांच्या विशेष कृती दलाला सोमवारी ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’ (बीकेआय) या दहशतवादी संघटनेच्या दोन खतरनाक दहशतवाद्यांना अटक करण्यात यश मिळाले. त्यांच्याकडून मोठय़ा प्रमाणावर शस्त्रसाठा देखील हस्तगत करण्यात आला आहे. उत्तर-पश्चिम दिल्लीत झालेल्या चकमकीदरम्यान या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून, भूपेंदर उर्फ दिलावर सिंह आणि कुलवंत सिंह अशी त्यांची नावे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सोमवारी वायव्य दिल्लीत विशेष मोहीम राबविली. यावेळी झालेल्या चकमकीनंतर दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही दहशतवादी बब्बर खालसा इंटरनॅशनशी (बीकेआय) संबंधित आहेत. हे दोघेही पंजाबमधील लुधियानाचे रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले आहे. पंजाबमध्ये अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये ते मोस्ट वॉन्टेड देखील आहेत. दोघांकडे सहा पिस्तूल आणि 40 काडतुसे सापडली आहेत.
गेल्या काही दिवसांत खलिस्तानसंदर्भातील हालचाली तीव्र झाल्या आहेत. जुलै महिन्यात बंदी घातलेली संस्था शीख फॉर जस्टिसने खलिस्तानच्या मागणीसाठी ‘जनमत 2020’ अंतर्गत मत नोंदणीसाठी कॅनेडियन पोर्टल ‘दिल्ली बनेगा खलिस्तान डॉट इन’ सुरू केले. या पथकाने नोंदणीसाठी पंजाबऐवजी दिल्लीची निवड केली म्हणून सुरक्षा यंत्रणांनी अलर्ट जारी केला. यापूर्वी जुलैमध्येच सरकारने एसएफजेशी संबंधित 40 वेबसाईटवर बंदी घातली होती. गृह मंत्रालयाने गेल्या वषी एसएफजेला ‘देशविरोधी कार्यात’ गुंतल्याबद्दल बंदी घातली होती.
यापूर्वी आयएस दहशतवाद्यावर कारवाई
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनेही गेल्या महिन्यात इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्याला अटक केली होती. अबू युसूफ नावाचा दहशतवादी धौला कुआन रिज रोड चकमकीनंतर पकडला गेला होता. त्याच्याकडे सुधारित स्फोटकांसह अनेक शस्त्रास्त्रे सापडली होती. आयएसच्या दहशतवाद्यांनी दिल्लीत मोठय़ा हल्ल्याची योजना आखली होती. दिल्लीतील अनेक बडे नेते त्यांच्या निशाण्यावर होते. दिल्लीत मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा त्यांचा विचार होता.