ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीतील भाजप नेते आणि आरटीआय कार्यकर्ते जुल्फिकार कुरेशी यांची आज सकाळी अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली. तसेच त्यांच्या मुलावरही चाकूने वार करण्यात आले.
जुल्फिकार सकाळी सुंदर नगरीच्या ओ ब्लॉक येथील एका मशिदीत मुलगा जानबाज यांच्यासोबत नमाज पढण्यासाठी गेले होते. तेथून परतत असताना अज्ञातांनी जुल्फिकार कुरेशी यांना मशिदीबाहेर गोळ्या घातल्या. तसेच मुलावरही चाकूने वार केले. या हल्ल्यात मुलगाही जखमी झाला आहे. जखमी मुलाला पोलिसांनी स्वामी दयानंद हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
जुल्फिकार हे भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीशी आणि संघाशी संबंधित इंद्रेश कुमार यांच्या हिमालय कुटुंबाशी संबंधित होते. त्यांच्यावर यापूर्वीही हल्ले झाले होते. नंद नागरी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.