ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीतील पीरागढी परिसरात आज पहाटे 4.30 वाजता एका कारखान्याला आग लागून झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली आहे. इमारत अचानक कोसळल्याने या परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझण्याचे प्रयत्न सुरू असताना स्फोट होऊन कारखान्याची इमारत कोसळली. यात अग्निशामक दलाच्या जवानांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.
या कारखान्यात लाकडी सामान असल्याने आगीने प्रचंड पेट घेतला. या आगीची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आल्यानंतर जवानांनी तातडीनं धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, आग विझवत असताना अचानक इमारतीत स्फोट झाला. या हादऱ्यानं इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अग्निशामक दलाच्या जवानांसह अनेक गाडले गेले आहेत.लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरून धावपळ उडाली.
दरम्यान, अग्निशमन दलाच्या 7 गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या असून इमारतीचा ढिगारा बाजूला काढण्याचं आणि आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे.